Nagar News – तीन महिन्यांपासून शिक्षक नाही, संतप्त ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे

पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सैदापूर येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकांचीच नियुक्ती झाली नाही. अखेर संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत शिक्षण विभागाचा निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर टकले यांनी केले. मुख्याधापक उल्हास बटुळे यांनी केलेल्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

हत्राळ सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. टकले यांच्यासह तेथील ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.

या मागणीची दखल न घेतल्याने आज टकले यांच्यासह हत्राळचे सरपंच दादा शिवणकर, सैदापुरचे सरपंच विष्णू केदार, बाबासाहेब दराडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी केदार, अंकुश टकले, सचिन पटारे, संभाजी बडे, राहुल केदार, गणपत क्षीरसागर, सुभाष पटारे आदींनी शाळेच्या मुख्य गेटला टाळे ठोकले.

पदवीधर शिक्षक द्या म्हणून आठ दिवसांपूर्वी मागणी करण्यात आली होती. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आम्ही दिलेल्या निवेदनाला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली, असे टकले यांनी सांगितले. येत्या 20 तारखेपर्यंत जर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली नाही तर विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.