अमोल भंडारेलाही मारण्याचा कामटेचा प्रयत्न होता, सरकारी पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनिकेत कोथळेला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमोल भंडारे याला सरकारी घाटावर दोन अज्ञात गुंडांच्या ताब्यात देण्यात आले होते. ‘तू काही बोलायचे नाही, नाहीतर तुलाही ठार मारून टाकीन’, अशी धमकी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने अमोल भंडारेला दिल्याचे जबाबात उघड झाले आहे. या संपूर्ण घटनेचे सादरीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयासमोर निदर्शनास आणत सरकार पक्षाचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयासमोर आज सलग दुसऱ्या दिवशी अनिकेत कोवळे खून खटल्याची सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षाचे वकीलही उपस्थित होते. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात घडलेला संपूर्ण घटनाक्रम व त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबोली येथे कोथळे यास घडलेली घटना अमोल भंडारे याने सविस्तर सांगितली आहे, असे ऍड. निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले.

स्वातंत्र्यानंतर अशी कोणतीही घटना हिंदुस्थानात आजवर घडलेली नाही. ब्रिटिशांइतकी क्रूर मारहाण आणि टॉर्चर यापूर्वी कधीही कुणी कोणास केलेली नाही, असे ऍड. निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले. केलेले कृत्य लपवण्यासाठी आरोपी पळून गेल्याचा बनाव करण्यात आला, हे भयानक आहे, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले. अमोल भंडारे याने हा सारा प्रवास सांगताना अंगावर शहारे येत होते. त्यालाही त्यात संपवण्याचा कट होता, हे कामटेच्या जबाबातूनच पुढे आले आहे, असा युक्तिवाद ऍड. निकम यांनी केला.

चालक संजय पाटील यांनी दिलेल्या साक्षीतील मुद्देही निकम यांनी मांडले. शासकीय वाहनात ठेवलेला अनिकेतचा मृतदेह चालक आरोपी राहुल शिंगटे याने कोल्हापूर रस्त्यावर आल्यानंतर आरोपी अनिल लाड याने स्वतःच्या गाडीत ठेवला. या दरम्यान शिंगटे याने त्याच्या ताब्यातील असलेले शासकीय वाहन या घटनेसाठी 34 किलोमीटर बेकायदेशीर फिरवले होते. वाहनाच्या शासकीय पुस्तकात शिंगटे यानेच किलोमीटरच्या आकडेवारीत खाडाखोड केल्याची साक्ष, चालक पाटील यांनी दिली आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील कामटे याने खासगी तंत्रज्ञ सुधीर पिसाळ याच्याकडून बदलून घेतल्याची साक्षदेखील पिसाळ यांनी दिली आहे.  यावरून अत्यंत क्रूरता समोर येत आहे, असे ऍड. निकम यांनी न्यायालयास सांगितले.

यावेळी सीआयडीच्या अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक प्रमोद नलवडे, सीआयडीचे तत्कालीन उपाधीक्षक व मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. सीआयडीचे अमोल ठाकूर, श्रीकांत बुलबुले, स्वप्नील जाधव यांनी सरकार पक्षाला मदत केली.

अंदमानमधील पद्धत कामटेने वापरली

युवराज कामटेच्या क्रूर कृत्याबाबत सांगताना ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘आंदमानमध्ये ब्रिटिशांनी मारहाणीबाबत जी क्रूर पद्धत वापरली, त्याच पद्धतीने बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे (मृत) यांनी मारहाण करून खून केला. त्याला आरोपी नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झाकीर पट्टेवाले यांनी मदत केल्याचे पुराव्यानिशी न्यायालयासमोर ठेवले आहे.’

वैद्यकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण साक्ष

अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या आमानूष माराहाणीतच मृत्यू झाल्याची महत्त्वपूर्ण साक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर दिली आहे, असे ऍड. उज्जवल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.