रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, अनिल परब लिंबू-मिरची घेऊन विधानपरिषदेत

रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब विधानपरिषदेत बोलताना म्हणाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही महिन्यांपासून मिंधे गट व अजित पवार गटात वाद सुरू आहेत. याचदरम्यान पालकमंत्री पदावर दावा करणारे मिंधे गटाचे भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचबद्दल बोलताना आज अनिल परब सभागृहात लिंबू-मिरची घेऊन दाखल झाले होते.

यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले आहेत की, “महायुती सरकार लाडक्या बहिणींना इतकी सुरक्षा देत आहे, इतका मान-सन्मान करत आहे. इतका मान-सन्मान करताना नागरिक म्हणून माझं ही कर्तव्य आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण सुरक्षित राहण्यासाठी, माझं योगदान काय आहे? हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. मी माझ्या बहिणीची सुरक्षा राखण्यासाठी काय करू शकतो? जसं आदिती तटकरे आमच्या बहीण आहेत. पंजक मुंडेही येथे बसल्या आहेत, आणखीन ही बहीण येथे बसल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. या विधेयकाच्या माध्यमातून तुम्ही जशी नगराध्यक्षांची सुरक्षा पाहत बघताय, आदिती तटकरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. या विधेयकात तुम्ही तितकीच काळजी घेतली आहे, पण पालकमंत्री म्हणून जर असं (अघोरी प्रकार) काही होणार असेल तर, त्याची काळजी कोण घेणार?”

अनिल परब म्हणाले, “सध्याच्या तांत्रिक-मांत्रिक युगामध्ये रायगड जिल्ह्यात तंत्र-मंत्र अघोरी प्रकार सुरू आहेत. यातच माझ्या बहिणीसाठी मला भीती वाटते, जाता-येता रस्त्यात कधी अपघात होऊ नये. कुठला मंत्र त्यांच्यावर येऊ नये, अघोरी प्रकार कुठले होऊ नये, भावाचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काही करू शकत नाही. मी अंधश्रद्धा मानत नाही. पण सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं. रायगड जिल्ह्यातील प्रकार सोशल मीडियावर बघितले, रेडे कापले गेले, बैल कापले गेले आणि बळी दिली असेल. अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून लिंबू-मिरची देतोय. माझ्या बहिणीची काळजी म्हणून माझ्या बहिणीवर जी काही इडा पिडा आली आहे, ती टाळावी म्हणून हे पाठवत आहे.”