
>> अनिरुद्ध प्रभू
बाइकवरून अगणित किलोमीटरची भटकंती करणारे नवरोज कॉन्ट्रक्टर यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे आशयघन सिनेमा भासावा असेच. या प्रेमासोबत प्रसिद्ध छायाचित्रकार आणि सिनेमॅटोग्राफर ही मूळ ओळख असणाऱया नवरोज कॉन्ट्रक्टर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व सिनेमॅटोग्राफी असलेल्या चित्रपटांचा महोत्सव नुकताच पुण्यात साजरा झाला. या प्रदर्शनातून उमगलेले, सापडलेले नवरोज यांची ही ओळख.
मला नवरोज कॉन्ट्रक्टर हे ‘प्रकरण’ कळलं ते कुणाच्या तरी रँडम सोशल मीडिया पोस्टमुळे! त्याआधी नवरोज मला ठाऊक होते ते समांतर सिनेमातल्या सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेमुळे – ‘दुविधा’ विशेष करून. बाकी काही ठाऊक नव्हतं. समोरही आलं नव्हतं आणि माहिती करून घ्यावं असं काही घडलं नव्हतं. गेल्या आठवडय़ात सोशल मीडियावरच्या त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘अजिबात चुकवू नका, या प्रदर्शनाला नक्की भेट द्या! PHOTOGRAPHY STRICTLY PROHIBITED!’ ते खरं तर नाव होतं हे कळायला मला तिथे जावं लागलं. मोजकेच फोटो होते, पण त्यातून फोटोग्राफर जे सांगू बघत होता ते रोजसारखं नव्हतं. हा फोटोग्राफर नवरोज कॉन्ट्रक्टर आणि सिनेमॅटोग्राफर नवरोज कॉन्ट्रक्टर एकच का? या प्रश्नानं मी गुगलकडे वळलो आणि हे प्रकरण समोर आलं.
शांताबाई गोखले नवरोजवरच्या मृत्युलेखात लिहितात, ‘2022 मध्ये कधीतरी मला त्याचा मेल आला. त्यात लिहिलं होतं, मी आत्मचरित्र लिहिण्याचं थांबवलं आहे. मी तो विचारच सोडून देतो आहे. जसं ठरलं होतं तसं मी सगळं लिहिण्याचा प्रयत्न तर केला – आतापर्यंत 150 पानं झाली आहेत आणि मी महाविद्यालयीन जीवनापर्यंतदेखील पोहोचलेलो नाहीये! मलाच हे सगळं फिक्शन वाटत आहे.’
का वाटलं नसतं फिक्शन? साठ वर्षांत 20 हजारांहून अधिक फोटो काढणारा माणूस, सहा आशयघन सिनेमे सिनेमॅटोग्राफी केलेला माणूस, दोन सिनेमे लिहिलेला माणूस आणि अगणित किलोमीटर अंतर आपल्या बाईकवर बसून चाकाखाली घालवलेला माणूस, आयुष्यभरात अनुभवलेलं, जगलेलं असं जे लिहिलं ते फिक्शन नाहीतर काय वाटेल?
त्यांचा मामा पाचगणीत कुठल्या तरी थिएटरात प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करे. दर उन्हाळी सुट्टय़ांत मामाकडे आल्यावर त्याच्या सोबत हेदेखील त्या प्रोजेक्शन रूममध्ये जात आणि त्याला रिळं बदलायला मदत करत. सिनेमा आणि कॅमेरा यांचा संबंध या रिळांमुळेच तयार झाला असं त्यांचं मत होतं. पुढे कॅमेऱयाप्रतीचं प्रेम इतकं वाढलं की, त्यांनी रीतसर बडोद्यातून त्यातच पदवी घेतली. स्थिरचित्रण हा त्यांचा लाडका विषय होताच, आता तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर ते भारतभर फिरू लागले, पण खरं तर कॅमेरा हे त्यांचं दुसरं प्रेम, पहिलं अर्थातच बाईक! जसा कॅमेरा आयुष्यात मामामुळे आला तशी बाईक आयुष्यात आली ती थोरल्या भावामुळे.
बारा वर्षांचे असताना त्यांचा मोठा भाऊ त्यांना घेऊन अहमदाबादहून अजिंठा, वेरूळ बघायला घेऊन आला… बाईकवरून! आज एकतर्फी 600 किमी असणारं हे अंतर तेव्हा 1000 किमी होतं. घर ते परत घर हा प्रवास त्यांना बाईकप्रेमात अखंड बुडवून ठेवायला आयुष्यभर पुरला. 80 वर्षांच्या आयुष्यातली जवळपास 60 वर्षे त्यांना कुणी कॅमेरा आणि बाईकशिवाय क्वचितच पाहिलं असेल असं त्यांचे मित्र, या प्रदर्शनाचे क्युरेटर संजीव शाह सांगतात.
त्यांनी लिहिलंदेखील ते बाईकवरच! ते ‘बाईक इंडिया’, ‘व्हील अनप्लग्ड‘, ‘झिगव्हील्स’साठी सातत्याने लिहीत. त्यांचं तसं एकच पुस्तक आलं – ‘द ड्रीम्स ऑफ द ड्रगन्ज चिल्ड्रन’. त्यांच्या चीनमधल्या सिनेमा बनवण्याच्या अनुभवावर होतं. बाकी लिखाण ते बाईकसंदर्भातच करत. या बाईक आणि कॅमेऱयानं त्यांना फार साथ दिली हेही खरं. बाईकवरून भारत ते युरोप तीन वेळेस, कित्येक वेळेस हिमालय आणि त्याहून अधिक वेळेस संपूर्ण भारत त्यांनी चाकाखाली घातला होता. त्याचमुळे ते 20 हजारांहून अधिक वैविध्यपूर्ण फोटो काढू शकले.
या दोनव्यतिरिक्त त्यांना अजून क्रिकेट आणि जॅझ या संगीत प्रकाराची आवड होती. बंगळुरूमध्ये क्रिकेट नीट रुजावं म्हणून प्रशिक्षक शिवानंद यांच्या सोबत त्यांनी कोरमंगला क्रिकेट अकादमीमध्ये जातीनिशी लक्ष घातलं होतं. याच अकादमीमधून पुढे कुणाल नायरसारखा खेळाडू समोर आला. जॅझवरचं प्रेम कधीतरी महाविद्यालयात असताना सुरू झालं, जे पुढे हळूहळू कर्नाटकी संगीतापर्यंत पोचलं आणि मुलीत उतरलं. ते सांगतात, “त्या काळात वीकेंडला बडोद्यातून चोरून मुंबईला जॅझ ऐकायला जात असे. चर्चगेट परिसरात चार जॅझ क्लब्स होते, जे लंच आणि डिनरच्या वेळेला लाईव्ह म्युझिक वाजवत असत. व्हेनिस हा क्लब सर्वोत्तम होता आणि तिथे उशिरापर्यंत चालायचं. कारण तिथे कॅबरेही असे. माझं त्या बँडशी खूप चांगलं मैत्र होतं. मध्यरात्री ढोलक्याला घरी जायची घाई असे तेव्हा शेवटचा सेट मीच वाजवत असे.’’
त्यांना पहिला सिनेमा कसा मिळाला, हाही किस्सा आहे. ते पंजाबमध्ये फोटो काढत फिरत होते आणि त्याचदरम्यान मणी कौल ‘उसकी रोटी’ या सिनेमासाठी लोकेशनच्या शोधात होते. यात कुठेतरी अधेमधे त्यांची भेट झाली आणि मैत्री झाली. कॅमेरा हा दुवा होताच, पण अजून एक दुवा होता तो म्हणजे संगीत. पुढे मणी कौलनी नवरोजला शब्द दिला – मी जर रंगीत सिनेमा केला तर तो तू शूट करशील! ‘दुविधा’ हा मणी कौलचा चौथा, तर नवरोजचा पहिला सिनेमा. त्यांनी एक खेडय़ात जवळपास अशक्य अशा परिस्थितीत चित्रीकरण केलं. फिल्म स्टॉक खूपच स्लो होता. लोकेशनवर लाइट्सचं ओझं सहन होणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी दोन सनगन्स आणि तेलाच्या दिव्यांमध्ये शूट केलं. ‘दुविधा’ कमालीचा सुंदर सिनेमा होता.
1980 च्या दशकाच्या मधल्या काळात नवरोज फीचर फिल्म्सकडून डॉक्युमेंटरी चित्रपटांकडे वळले. दोन्ही प्रकारच्या चित्रपट माध्यमांची सखोल जाण असलेले ते एक वेगळे सिनेमॅटोग्राफर ठरले. त्यांचं बहुतांश डॉक्युमेंटरीचे काम त्यांची पत्नी दीपा धनराज हिच्यासोबत झालं. या जोडीने जवळपास सहा लघुपट बनवले.
नवरोज आयुष्यभर बाईकवर हिंडले. वयाच्या 80 व्या वर्षीदेखील ते बाईकवर हिंडत असत. चाकावर प्रचंड भ्रमंती केलेल्या या माणसानं आयुष्यभर ‘सेफ ड्रायव्हिंग’ला प्रमोट केलं, शिकवलं. आयुष्याची शोकांतिका अशी की, बाईकवरच आयुष्य गेलेल्या नवरोजचा मृत्यू बाईक अपघातातच झाला. नेहमीच्या रविवार विशेष परंपरेनुसार बाईकवरून फेरफटका मारायला निघालेल्या नवरोजना चुकीच्या बाजूने आलेल्या आणि दारू प्यायलेल्या मुलाच्या बाईकने ठोकर दिली आणि त्यातच ते गेले.
मी कदाचित ती सोशल मीडिया पोस्ट पाहिली नसती किंवा त्या फोटो प्रदर्शनाला गेलो नसतो तर मला नवरोज कळले असते का? नसते कळले तरी त्यात नवरोजचं काहीच गेलं नसतं. नुकसान माझंच होतं. मला तिथे जायची बुद्धी झाली यासाठी देवाचे आभार मानायला हरकत नाही.
[email protected]
(लेखक पुस्तक व्यवसायक्षेत्रात कार्यरत आहेत.)