
लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर भार पडू लागल्याने महायुती सरकारने योजनेचे निकषच बदलण्याचा घाट घातला आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सरकारवर टीका केली. दहावी पास अर्थमंत्री असेल तर असेच होणार, असा टोला त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना लगावला.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. इतर योजनांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्याचे निमित्त साधून महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीसारख्या काही कल्याणकारी योजनांना सरकार कात्री लावत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. पण आता नवे जाचक निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपीही त्यांनी केला.