अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य खंडरूपात, अनमोल खजिना अवघ्या 60 रुपयांत

वंचित शोषितांसाठी लेखणी चालवून त्यांचा आवाज बनलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य खंडरूपात आले आहे. अगदी नाममात्र किमतीत म्हणजे प्रत्येक खंड अवघ्या 60 रुपयांत उपलब्ध आहे. अण्णाभाऊंचे लेखन नव्या पिढीपर्यंत पोचावे यासाठी डिजिटल माध्यमातूनही ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने गेल्या वर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या समग्र साहित्याचे 1 ते 4 खंड आठ भागांत वाचकांच्या हाती आले. एपूण चार हजार पानांचे हे साहित्य आहे. यामध्ये ‘फकिरा’, ‘चित्रा’, ‘वारणेच्या खोऱ्यात’सारख्या गाजलेल्या 30 कादंबऱ्या आणि 10 कथासंग्रह आहेत. महिनाभरात अण्णाभाऊंच्या उर्वरित कथांचा पाचवा खंड प्रकाशित होईल. दोन भागांत पाचवा खंड येणार असून तो एक हजार पानांचा आहे.

‘‘आजच्या तरुणाईपर्यंत अण्णा भाऊंचे साहित्य पोचले पाहिजे. तरुणाई कागदावरून स्क्रीनकडे वळलेली आहे. त्यांना अण्णा भाऊंचे साहित्य स्क्रीनवर म्हणजेच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी ते डिजिटल करण्याचे काम सुरू आहे,’’ असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. मिलिंद कसबे यांनी सांगितले.

30 कादंबऱया, 10 कथासंग्रह ऑडियो स्वरूपात

अण्णा भाऊंचे समग्र साहित्य ऑडियो बुक, ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्या चार खंडांतील 30 कादंबऱया आणि 10 कथासंग्रह ऑडियो बुक आणि ई-बुकमध्ये आलंय. पुस्तक मार्केट अॅपवर निःशुल्क ऐकता येईल. लवकरच एक हजार पानांचा पाचवा खंडदेखील ऑडियो/ ई-बुकमध्ये येणार आहे.

शब्दकोश येणार

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱया खंडाच्या रुपात आल्यानंतर त्यांची शाहिरी, नाटय़लेखन यावर काम केले जाणार आहे. त्यांच्या साहित्याचा शब्दकोशही तयार केला जाईल.