ताडोबातील दुसरी वाघीण ‘चांदोली’त दाखल

‘ऑपरेशन तारा’अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुसरी वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. सोनार्ली अनुकूलन कुंपणात मंगळवारी सायंकाळी तिला ‘सॉफ्ट रिलिज’ करण्यात आले.

दोन वर्षे वयाची ही वाघीण (की सेव्हन-एस टू) सोमवारी (दि. 8) सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले.

सॉफ्ट रिलिज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. ही संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश तसेच फिल्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील या वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्र्ााrय निरीक्षण करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून, या मोहिमेवर व्याघ्र प्रकल्पाचे सहायक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे व मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे. वाघिणीची सुरक्षित सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्या समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली.

सह्याद्रीतील वाघ संवर्धनास बळकटी येईल

वाघीण (की 7-ए 2) ही कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातील तरुण भ्रमणशील मादी आहे. ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील व्याघ्रसंवर्धनास अधिक बळकटी देईल, असे ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले.

‘ऑपरेशन तारा’अंतर्गत ताडोबामधून आलेली दुसरी मादी वाघीण पूर्णतः निरोगी असून, चांदोली परिसरात तिला आवश्यक असा सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा उपलब्ध आहे.

– तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.