…तर प्रादेशिक युद्ध सुरू होईल, अयातुल्ला अली खोमेनी यांचा ट्रम्प यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “जर अमेरिकेने इराणवर कोणताही लष्करी हल्ला केला, तर त्याचे रूपांतर मध्य पूर्व आशियातील प्रादेशिक युद्धात होईल,” असे खोमेनी यांनी रविवारी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर खोमेनी यांनी हे विधान केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

अयातुल्ला अली खोमेनी यांनी पहिल्यांदाच अमेरिकेला असा थेट इशारा दिल्याचे बोलले जात आहे. इराणमधील देशव्यापी आंदोलने चिरडण्यासाठी तेहरानने केलेल्या कारवाईनंतर ट्रम्प यांनी ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ ही विमानवाहू युद्धनौका आणि इतर जहाजे अरबी समुद्रात तैनात केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रत्यक्ष बळाचा वापर करणार का, हे अद्याप स्पष्ट नसले तरी खोमेनी यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.

इराणी सरकारी टेलिव्हिजनने खोमेनी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “अमेरिकेने हे लक्षात ठेवले पाहिजे की, जर त्यांनी युद्ध सुरू केले, तर यावेळी ते केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण प्रादेशिक युद्ध असेल.” ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा इराणशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली असून, इराणचा अणू कार्यक्रम हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. मात्र खोमेनी यांनी अमेरिकेच्या कोणत्याही आक्रमक पाऊलाला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

खोमेनी यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही देशाला चिथावणी देऊ इच्छित नाही किंवा कोणावरही हल्ला करू इच्छित नाही. परंतु, जर कोणी इराणवर हल्ला करण्याचा किंवा छळण्याचा प्रयत्न केला, तर इराणन त्याला चोख प्रत्युत्तर देईल.”