
Apple चे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाबाबत नाराजी उघड केली आहे. एआयच्या सध्याच्या क्षमतांमुळे आपण निराश आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच माणसांची जागा एआय इतक्या लवकर घेईल असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Apple च्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त सीएनएन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वोझ्नियाक यांनी एआयच्या भविष्यासंदर्भात आपले मत मांडले. ते म्हणाले, ”मी एआयचा फारसा वापर करत नाही, मात्र त्याची चाचणी घेण्यासाठी काही प्रश्न विचारले. एखाद्या प्रश्नात मी ज्या मुद्द्यावर भर देतो, त्याऐवजी एआय विषयाशी संबंधित खूप माहिती देते, पण मला नेमके हवे ते उत्तर मिळत नाही.”
ते पुढे म्हणाले की, एआयची उत्तरे अनेकदा खूपच परफेक्ट आणि कोरडी वाटतात. मला मानवी स्पर्श असलेली उत्तरे अपेक्षित असतात, पण अनेकदा निराशा होते, असे त्यांनी सांगितले. उद्योगातील अनेक नेते एआय माणसांची जागा घेईल असा दावा करत असले, तरी वोझ्नियाक अद्याप तसे कोणतेही संकेत दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वोझ्नियाक यांनी केलेले हे विधान जेन्सन हुआंग यांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे. NVIDIA चे मुख्य कार्यकारी अधिकारी हुआंग यांनी मानवसमान कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच AGI (Artificial General Intelligence) आपण साध्य केली असल्याचा दावा केला आहे. हुआंग यांनी पाॅडकास्ट मध्ये बोलताना सांगितले की, एआय आता स्वयंचलितपणे मोठे आणि गुंतागुंतीचे व्यवसाय सुरू करून चालवण्यास सक्षम होऊ शकते. त्यांनी असेही सुचवले की, एखादा डिजिटल इन्फ्लुएन्सर किंवा सोशल अॅप अचानक प्रचंड लोकप्रिय होऊ शकतो.


























































