
डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि दूरदर्शनच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अरणगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय रुजविण्यासाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विघ्नहर्ता फाऊंडेशन आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून दररोज सायंकाळी ७ वाजता ‘अभ्यासाचा भोंगा’ वाजविला जातो. भोंगा वाजताच गावातील विद्यार्थी मोबाईल, टीव्ही आणि इतर मनोरंजनाच्या साधनांपासून दूर राहून दोन तास अभ्यासाला बसतात. या काळात पालकही मुलांना शांत आणि अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देतात.
उपक्रमाचे मार्गदर्शक शंकर गदादे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची शिस्त निर्माण व्हावी आणि मोबाईलच्या अतिवापरापासून त्यांची सुटका व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पालकांकडून सकारात्मक सहकार्य मिळत आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विघ्नहर्ता फाऊंडेशनचे सदस्य दररोज गावात फिरून विद्यार्थी अभ्यास करीत आहेत की नाही, याची पाहणी करतात. सातत्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
अरणगावचा हा अभिनव प्रयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, डिजिटल माध्यमाच्या अतिवापरावर मात करत अभ्यासाला प्राधान्य देण्याचा संदेश देत आहे. गावातील ‘अभ्यासाचा भोंगा’ आता इतर गावांसाठीही अनुकरणीय उपक्रम ठरत आहे.
आजच्या पाहणीमध्ये ८२ टक्के विद्यार्थी अभ्यास करताना आढळले, ही अतिशय समाधानकारक बाब आहे. काही ठिकाणी मोबाईलचा वापर व टीव्ही सुरू असल्याचे दिसून आले.
आजच्या पाहणीचा आढावा
विद्यार्थ्यांच्या घरी भेटी- ११
मन लावून अभ्यास करणारे विद्यार्थी ९
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट बक्षीस – ९
अभ्यास न करता रिकामे बसलेले – १
मोबाईल वापर करताना आढळले – १
पाहणीच्या वेळी टीव्ही सुरू होता – १ घर




























































