महाराष्ट्र तिरंदाजीत अचूक निशाणा साधतोय!

489

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात इतर खेळांतील खेळाडूंप्रमाणे तिरंदाजांनाही घरामध्ये बसून सराव व फिटनेसवर मेहनत घ्यावी लागली. याप्रसंगी आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदूरकर यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र या खेळामध्ये योग्य ट्रकवर रूढ होत असल्याचे विश्वासाने सांगितले. सुखमिनी बाबरेकर (अमरावती) व प्रवीण जाधव (सातारा, हिंदुस्थानी आर्मी), तिशा संचेती (पुणे) या तिन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंचा देशातील अव्वल आठ खेळाडूंमध्ये समावेश होत आहे. टोकियो ऑलिम्पिकआधी चार ते पाच निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यास तिघांचे ऑलिम्पिक तिकीट बुक होऊ शकते, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

सरकारच्या निर्णयावर सराव व स्पर्धा अवलंबून

तिरंदाजी हा तसा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ नाही. तसेच या खेळामध्ये प्रत्येक तिरंदाज हा स्वतःचे उपकरण वापरत असतो. त्यामुळे संसर्गाचाही प्रश्न यावेळी निर्माण होत नाही. मात्र सराव व स्पर्धा केव्हा सुरू करायच्या याबाबतचा अंतिम निर्णय सरकार घेईल. सप्टेंबर महिन्यात सरावाला तर ऑक्टोबर महिन्यात स्पर्धांना सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रमोद चांदूरकर यांना वाटते.

ऑनलाइन कोचिंग व जजेज सेमिनार

आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया, साई, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन कोचिंग व जजेज सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये तांत्रिक बाबींवर लक्ष देण्यात आले. या कालावधीत कोचेस ट्रेनिंगवर जोर देण्यात आला. कारण एक कोच भविष्यात किमान दहा खेळाडूंना तयार करू शकतो. या सेमिनारसाठी द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारप्राप्त व्यक्तींची तसेच जागतिक आर्चरी संघटनेचीही मदत घेण्यात आली. याप्रसंगी मानसशास्त्रज्ञ, फिजिओ, स्पोर्टस् मेडिसिन डॉक्टर यांच्याकडूनही मार्गदर्शन करण्यात आले. एकूणच काय तर या सेमिनारमधून हिंदुस्थानी संघ कसा काय तयार होऊ शकतो यासाठी पावले उचलण्यात आली, असे प्रमोद चांदूरकर यांनी आवर्जून सांगितले.

राज्यातील खेळाडूंसाठी विशेष ट्रेनिंग

आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात येणारे सेमिनार हिंदी व इंग्रजी या भाषांमधून होते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही विभागांतील खेळाडूंना समजण्यास अडचण निर्माण झाली असेल. त्यामुळे महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनकडूनही विशेष ट्रेनिंगचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले. बांध्यावरच्या आर्चरीच्या सहाय्याने खेळाडूंना शेतामध्ये तिरंदाजी करण्यास सांगण्यात आले. हा उपक्रम आठ दिवस राबवला, असे प्रमोद चांदूरकर यावेळी म्हणाले.

प्रगतीनुसार खर्च वाढतो

क्रिकेट या खेळामध्ये एक बॅट 300 रुपयांनाही मिळते, तर 5 ते 10 हजारांपर्यंतही बॅट विकत घेता येऊ शकते. बॅटच्या दर्जाप्रमाणे किंमत ठरवली जाते. तसेच खेळाडू कोणत्या स्तरावर खेळतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. तिरंदाजीमध्येही तोच प्रकार आहे. पाच ते सात हजारांचा धनुष्यबाण घेऊनही खेळाडू खेळू शकतात, पण हा धनुष्यबाण प्रायमरी किंवा राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मर्यादित असतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरल्यावर किमान एक लाख रुपयांचा धनुष्यबाण घेणे गरजेचे असते. एकूणच काय, कोणत्याही खेळामध्ये प्रगतीनुसार खर्च वाढतो, असे प्रमोद चांदूरकर सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या