अर्जेंटिनात असंतोषाचा भडका; आर्थिक सुधारणा विधेयकाविरोधात लोक रस्त्यावर

आर्थिक गर्तेत सापडलेल्या अर्जेंटिनामध्ये राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात असंतोषाचा भडका उडाला आहे. बुधवारी सिनेटमध्ये हे विधेयक सादर होताच राजधानी ब्युनोस आयर्समध्ये लोक रस्त्यावर उतरले. संसदगृह काँग्रेस बाहेर लोकांनी निदर्शने केली.

महागाईचा दर 300 टक्के देशातील 40 टक्के लोक गरीब
अर्जेंटिनामध्ये महागाईचा दर 300 टक्क्यांवर पोहोचला आहे. खर्च हाताबाहेर गेले असताना देशात गरिबीही वाढत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या गरीब आहे. नव्या सुधारणांमुळे महागाई नियंत्रणात येईल, देशावरील कर्जाचा बोजाही कमी होऊ शकतो, असा राष्ट्राध्यक्ष मिली यांचा दावा आहे.

आंदोलकांकडून जाळपोळ, पेट्रोल बॉम्बचा वापर
बीबीसी न्यूजनुसार, संताप व्यक्त करणाऱ्या आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकले आणि दगडफेकही केली. या वेळी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा, रबर बुलेट आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. ‘देश विक्रीसाठी नाही’ अशा घोषणा देत पोलिसांचे कडे तोडून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱया आंदोलकांनी सुरक्षा अधिकाऱयांवर दगडफेक केली. पोलिसांनी या वेळी त्यांना मागे हटवण्यासाठी पेपर स्प्रे वापरला. या निदर्शनात विरोधी पक्षाचेही अनेक खासदार सहभागी झाले होते. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत पोलिसांसह 20 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी 18 जणांना अटक केली असून, जखमी खासदारांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विधेयक
– अर्जेंटिनाची ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी उजव्या विचारसरणीचे अध्यक्ष जेवियर मिली यांनी संसदेत हे विधेयक मांडले आहे. याअंतर्गत देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय पेन्शनमध्ये कपात आणि कामगार हक्क कमी करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. डावे राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

– अर्जेंटिना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (चेंबर ऑफ डेप्युटीज) हा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आला होता. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर एप्रिलमध्ये तो मंजूर झाला. त्यानंतर बुधवारी ते सिनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) मांडण्यात आले. येथे सुरुवातीला 36-36 मतांनी बरोबरी झाल्यावर, सिनेटचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व्हिक्टोरिया व्हिलारुएल यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. आता या विधेयकाच्या प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा केली जाईल, त्यानंतर ते पुन्हा कनिष्ठ सभागृहात अंमलबजावणीसाठी पाठवले जाईल.