यवतमाळ येथील चिल्ली येथे सशस्त्र दरोडा; 30 लाख रुपये रोख, 20 तोळे सोनं लंपास

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यात चिल्ली ईजारा येथे घनदाट जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यामध्ये सुमारे 30 लाख रुपये रोख आणि 20 तोळे सोनें असा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे.

चिल्ली ईजार येथील पांडे कुटुंबीय हे घरंदाज शेतकरी आहेत. मागील 60 वर्षांपासून या जंगलातच मोठ्या वाड्यात ते वास्तव्याला आहेत. त्यांची वडिलोपार्जित 50-60 एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वीच कापूस विकून आणलेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज कपाटात त्यांनी ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास सहा दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्याने वाड्यात घुसले. वाड्यात संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणी होत्या. दरोडेखोरांनी प्रथम संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली आणि बंदुक आणि तलवारीच्या धाकावर कपाटातील रोख रक्कम आणि सोनं घेऊन पोबारा केला. या घटनेमध्ये संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे आणि सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली. घटनेची तक्रार संतोष पांडे यांनी महागाव पोलिसात दिली आहे. तसेच दरोडेखोर हे मराठी आणि हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती पांडे कुंटुबीयांंनी पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगताप साहेब, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड, महागावचे ठाणेदार सोमनाथ जाधव, निलेश पेंढारकर, डॉग युनिट, फिंगर प्रिंट युनिट यवतमाळ घटनास्थळी दाखल होते.