शोपियानमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

शस्त्रसंधीनंतरही हिंदुस्थानी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच असून दहशतवाद्यांची शोधमोहीमही जारी आहेत. यादरम्यान जम्मू-कश्मीरच्या शोपियान जिह्यातील केलर येथे आज मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. कारवाईत एके -47 सह बंदूका, हँड ग्रेनेड, हजारोंच्या संख्येने काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. केलरमध्ये 13 मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी लश्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. शोपियान जिह्यात शुक्रू जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही चकमक उडाली. या ऑपरेशनला ‘केलर’ असे नाव देण्यात आले होते. खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर शाहीद कुट्टी याचाही समावेश होता.