लष्करी अधिकाऱ्याचा स्पाईसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला; जबडा तुटला, मणक्याला दुखापत

स्पाईसजेट एअरलाइन्सच्या एका प्रवाशाने चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. श्रीनगर विमानतळावर  26 जुलै रोजी घडलेल्या या  घटनेचा व्हिडिओ समोर आला. आरोपी प्रवासी हा लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहे. त्याच्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एका कर्मचाऱ्याचा जबडा तुटला असून एकाच्या मणक्याला दुखापत झाली आहे, असा दावा पंपनीने केला आहे.

श्रीनगरहून दिल्लीला निघालेल्या एसजी 386 विमानाच्या बोर्डिंग गेटवर हा प्रकार घडला. प्रवाशांच्या रांगेसाठी असलेल्या बॅरिकेडचा दांडा काढून आरोपीने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात एक कर्मचारी बेशुद्ध झाला. त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यावरही आरोपीने हल्ला केला. त्यात त्याचा जबडा तुटला. एकाच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. या घटनेमुळे एकच घबराट उडाली. सीआयएसएफच्या जवानांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले.

नेमके काय घडले…

आरोपीकडे 16 किलो वजनाचे सामान होते. नियमानुसार 7 किलोचे सामान नेण्यास परवानगी आहे. जास्त सामानासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. तसे कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले. त्यास विरोध करत तो बळजबरीने फ्लाईटच्या दिशेने निघाला. कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच त्याने थेट हल्ला केला.

हल्लेखोराला विमानबंदी

या प्रकरणी पंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रवाशाच्या विमान उड्डाणावर

बंदी घालण्याच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्पाइस जेटने नागरी उड्डाण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहून आरोपीविरोधात योग्य कारवाईची मागणी केली आहे.