
मधुमेह, स्थूलत्व, मणक्याचा आजार व उच्च रक्तदाब असलेल्या सैन्य व हवाई दलातील जवानांना अपंग पेन्शनचा लाभ मिळेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठाने दिला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे होत असलेल्या आजारांसाठी जवानांना अपंग पेन्शनचा लाभ देता येणार नाही, असा दावा केंद्र सरकार व वैद्यकीय बोर्डाने केला होता. हा दावा सशस्त्र दल न्यायाधिकरणाने फेटाळून लावला. त्याविरोधात केंद्र सरकारने न्यायालयाचे दार ठोठावले होते. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने न्यायाधिकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले.
पेन्शन म्हणजे सरकारकडून दिली जाणारी बक्षिसी नव्हे. जवानांनी दिलेल्या सेवेची ती भरपाई असते. याने जवानांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळते.
मधुमेह किंवा अन्य आजार सेवेत असताना झाल्याचा पुरावा जवानांकडून मागणे अयोग्य आहे.






























































