घाटकोपर होर्डिंगदुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खानने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने अलीकडेच त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. महाकाय होर्डिंगउभारण्यास इगो मीडिया कंपनीला परवानगी मिळवून देण्यासाठी अर्शद खानने एक कोटीहून अधिक रुपये घेतल्याचा आरोप आहे.
अर्शद खानतर्फे अॅड. मयूर सानप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 5 सप्टेंबरला न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी अर्शद खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अर्शद खान व तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त पैसर खालिद यांची पत्नी सुमन खालिद हे दोघे ‘महापारा लकनोवी गारमेंट्स’ या कंपनीत व्यावसायिक भागीदार होते. पैसर खालिद यांच्याच कारकिर्दीत महाकाय होर्डिंगउभारण्यास इगो मीडिया कंपनीला परवानगी दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या अनुषंगाने होर्डिंगच्या परवानग्या मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत अर्शद खान व इतरांच्या सहभागाची चौकशी आवश्यक आहे, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले होते. त्यावर खानने आक्षेप घेतला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली, त्यावेळी ज्येष्ठ वकील संजीव कदम यांनी खानतर्फे युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेताना न्यायालयाने आरोपांची पडताळणी करण्यासाठी खानचे बँक स्टेटमेंट व व्यवहारांशी संबंधित इतर तपशील मागवला आहे.