जागर – जगातील एकमेव अन्न आत्मनिर्भर देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भावेश ब्राह्मणकर

एखादा देश स्वतला लागणारे अन्न स्वतच पिकवतो असे सांगितले तर विश्वास बसेल का? पण हो, या देशाने हे करून दाखवले आहे. कसं केलं त्या देशाने सगळं? हे इतरांनाही शक्य आहे का?

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जेव्हा जगातील महासत्ता असलेले देशही अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत, तेव्हा दक्षिण अमेरिकेतील एका छोट्याशा देशाने संपूर्ण जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. गयाना असे या देशाचे नाव आहे. जगातील 186 देशांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, गयाना हा एकमेव असा देश आहे जो आपल्या गरजेच्या सातही श्रेणींमधील अन्नपदार्थ स्वतच पिकवतो. विशेष म्हणजे, या देशाचा भारताशी अतिशय जवळचा संबंध असून येथील संस्कृतीवर भारतीय ठसा उमटलेला आहे. गयानाने मिळविलेला हा विजय एक स्पष्ट धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून घडलेला यशप्राप्त अनुभव आहे.

‘नेचर फूड’ या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, गयाना हा अन्नधान्य उत्पादनात 100 टक्के स्वयंपूर्ण ठरला आहे. तांदूळ, गहू, मका यासारखी तृणधान्ये, कडधान्ये, फळे आणि भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस (पोर्क, बीफ, पोल्ट्री), मासळी आणि तेलबिया अशा महत्त्वाच्या सातही विभागांत हा देश कुणावरही अवलंबून नाही. जगातील बडे देश जसे की अमेरिका (केवळ 4 श्रेणीत सक्षम), ब्रिटन (2 श्रेणी) आणि चीन (6 श्रेणी) देखील ही किमया साधू शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर गयानाचे यश डोळे दिपवणारे आहे.

गयाना हे दक्षिण अमेरिकेच्या कॅरिबियन किनाऱयावर वसलेले एक छोटे, पण फलदायी राष्ट्र आहे. याची लोकसंख्या सुमारे 8 लाख इतकी असून, निसर्गाची अनुकूलता आणि कृषी रणनीती यांचा योग्य संगम मिळून या देशाने अद्वितीय प्रगती साधली आहे. गयानाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 40 टक्के लोक (सुमारे 3.5 लाख) भारतीय वंशाचे आहेत. 19 व्या शतकात ब्रिटीश राजवटीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अनेक भारतीयांना गयानामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नेण्यात आले होते. आज त्यांचे वंशज या देशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. गयानातील जेवणात आजही बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशची चव मिळते. ‘दाल पुरी’, ‘कढी-भजी’, ‘बारा’ (वडा) आणि ‘सात भाजी’ हे येथील लोकप्रिय खाद्यप्रकार आहेत.

गयानाचे भौगोलिक क्षेत्रफळ भारताच्या गुजरात राज्याइतके आहे, मात्र लोकसंख्या त्यामानाने अत्यंत कमी आहे. या देशाने केवळ नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून न राहता धोरणात्मक निर्णय घेतले. गेल्या काही वर्षांत गयाना सरकारने कृषी क्षेत्रावरील खर्चात तब्बल 468 टक्क्यांनी वाढ केली आहे. केवळ तांदूळ किंवा साखर या पारंपरिक पिकांवर लक्ष न देता, त्यांनी मका, सोयाबीन आणि दुग्ध व्यवसायालाही प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर सिंचन व्यवस्था, रस्ते, साठवणूक क्षमता आणि शेतकरी प्रशिक्षण यावर त्यांनी सातत्याने गुंतवणूक केली. दक्षिण अमेरिकेतील अनेक देश शेतीसाठी जंगल तोडत असताना गयानाने आपल्या 85 टक्के भागातील जंगले सुरक्षित ठेवून उपलब्ध जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला आहे. विषुववृत्ताजवळ असलेल्या गयानाला वर्षभर पाऊस, आर्द्रता आणि अमेझॉन नदी प्रणालीमुळे प्राप्त झालेली सुपीक जमीन लाभली आहे. या नैसर्गिक वरदानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे.

फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, गयानाने विविध पिकांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. जसे की, भात, कॉर्न आणि सोया, मसाले, हळद, अद्रक, भाज्या व फळे, मत्स्यपालन आणि दुग्धजन्य उत्पादने, मधमाश्या पालन. या सर्व क्षेत्रांना सक्षम करून गयानाने विविधकरणामुळे अन्नचक्र अधिक स्थिर व सुरक्षित केले आहे. गयानामध्ये युवा, महिला आणि लहान शेतकऱयांना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देणारे कार्यक्रम सुरू केले गेले. विविध सरकारी योजना आणि उपक्रमांद्वारे नवयुवक कृषि उद्योगात रुजू केले असून, अनेकांना स्वतचा व्यवसाय उभा करण्यास मदत झाली आहे. हे निर्णय राष्ट्रीय अन्न मूल्य साखळीला मजबुती देतात.

पूर्ण स्थानिक अन्न पुरवठा झाल्यामुळे गयानाचे परकीय बाजारांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. नवीन पिके, प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधींमुळे ग्रामीण भागात तरुण वर्गात कृषी व्यवसायात रस वाढला आहे. गयानाचा हा आत्मनिर्भर पॅटर्न वाखाणण्याजोगा आहे. अर्थात गयानापुढे अजूनही आव्हाने कायम आहेत. जसे की, हवामान बदलामुळे काही क्षेत्रात पिकांचे नुकसान, सुविधा, संरक्षण आणि निर्यातीसाठी अधिक गुंतवणूक, मागास भागात सामाजिक समावेश सुनिश्चित करणे. गयानाने पुढील दशकात कॅरिबियनच्या अन्न उत्पादनाचं हब बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी तंत्र, व्यापार संधी आणि भांडवल वाढवण्याचा मानस आहे.

आज अनेक देश अन्नासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत. जागतिक उत्पादनाच्या भांडवलवादी शृंखलेमुळे, युद्ध, हवामान बदल किंवा जागतिक व्यापारातील अडथळे, यामुळे अन्नपुरवठा संकटाची स्थिती उद्भवू शकते. काही देश मुख्य अन्न घटकांना निर्यात करतात, तरीही ते संपूर्णपणे अन्नपुरवठा करू शकत नाहीत. कारण त्यांना काही आवश्यक अन्न तसेच धान्य हे आयात करावे लागते. विकसित देशही जे करू शकले नाही ते गयानाने करून दाखविले आहे. गयानाची ही यशोगाथा दाखवते की, नैसर्गिक संसाधने, धोरणात्मक गुंतवणूक, सामाजिक सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर या साऱयाच्या जोरावर अन्न सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श मार्ग तयार होऊ शकतो.

जर उद्या जगाचा व्यापार काही कारणास्तव पूर्णपणे ठप्प झाला, तरी गयानाचे नागरिक उपाशी राहणार नाहीत. अन्न सुरक्षेच्या बाबतीत हा देश स्वावलंबी असण्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलाच्या संकटात जगातील इतर देशांसाठी गयानाचे हे मॉडेल एक दीपस्तंभ ठरू शकते. अशा प्रकारे, भारताची संस्कृती जपणारा हा छोटासा देश आज जागतिक स्तरावर ‘अन्नदाता’ म्हणून आपल्या स्वयंपूर्णतेचा झेंडा फडकवत आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)