परीक्षण – आठवणींच्या अवकाशात फेरफटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. श्रीरंग देशपांडे

‘आडगावचे दिवस’ हा निळकंठ देशमुख यांचा दुसरा ललित संग्रह. ‘देशमुखी’ हा त्यांचा पहिला ललित संग्रह. सरकारी वकील, जिल्हा न्यायाधीश ते लेखक असा त्यांचा प्रवास आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे जणु त्यांच्या सुवर्ण काळातील अविस्मरणीय ठेवींच्या संग्रहालयाची सफर आहे. त्या पिढीतले जवळपास सगळेच मान्य करतील की भौतिक सोयी कमी असल्या तरी मानवी संबंधाच्या दृष्टीनं तो सुवर्ण काळच होता.

लेखकानं ज्या वस्तूंच्या, वातावरणाच्या, मूल्यांच्या आठवणी स्वतच्या आयुष्याच्या संदर्भात जागवल्या आहेत, त्या सर्वच त्या पिढीतल्या वाचकाला त्याच्या आठवणींच्या विश्वात फेरफटका मारून आणतात. नवीन पिढीसाठी हे लेख म्हणजे जुन्या काळाचा मराठवाडी सांस्कृतिक, सामाजिक दस्तावेज आहे.

प्रवासात पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या, कितीही सामान पोटात दडवणारा होल्डऑल, पेट्रोमॅक्स या वस्तू घरात असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं. सामान्य परिस्थिती असलेल्या घरात सायंकाळी चिमणी किंवा कंदील मिणमिणायचा. पेट्रोमॅक्सचा आवाज आणि उजेड म्हणजे बडी आसामी. पेट्रोमॅक्स पेटवणं म्हणजे विशेष कौशल्याचं काम समजलं जायचं. याचं वर्णन लेखकानं समर्थपणे केलं आहे. तत्कालीन मापं आजच्या पिढीसाठी ऐतिहासिक वस्तू आहेत.

पण ज्यांनी ती पाहिली आहेत, त्यांचा व्यवहार केला आहे त्यांच्यासाठी त्या आठवणी खूपच भावनिक आहेत. ‘लोखंडी अथवा पत्राचे गोल डब्याच्या आकाराची मापे वापरली जात. निठवा हे छोटे माप. दोन निठव्याचा एक आठवा. (अंदाजे पाव किलो). दोन आठव्यांचा अच्छेर (आधा शेरचा अपभ्रन्श, अर्धा किलो). चार आठव्याचा एक शेर. दोन शेराची आदली आणि दोन आदल्याची एक पायली. सोळा पायल्याचा एक मण. वगैरे…’ हे वाचताना वाचक गत स्मृतीत रममाण होतो. (योगायोगानं हे पुस्तक वाचत असतानाच्या दिवसात माझ्या हाती अनेक वर्षे सांभाळून ठेवलेलं एक आण्याचं नाणं आलं. किती वेळ मी ते नाणं हातात धरून बसलो होतो! आठवत होतो, तेव्हा एक नाण्यात किती आइसफ्रुट, किती राजगिऱयाचे लाडू घ्यायचो!!).

जुन्या काळातील आणि अजूनही ग्रामीण भागात सर्रास वापरले जाणारे खास मराठवाडी शब्द जागोजागी पेरलेले आहेत. जसे, सडका, पाणी शेंदणं, आगळ, हर्राशी इ. ते वाचून आपलेपणाचा सुखद अनुभव येतो. बाहेर प्रमाण मराठी आणि घरी त्या त्या भागातली बोली भाषा असं प्रेमळ संतुलन साधणाऱयांचा एक वर्ग आहे. मराठवाड्यातल्या मोठमोठ्या साहित्यिकांची तशी परंपरा आहे. लेखक त्या वर्गात मोडतात.

तीक्ष्ण निरीक्षण, तीव्र स्मरणशक्ती, विपुल शब्दभांडार, ओघवतं कथन ही निळकंठ देशमुखांच्या लिखाणाची बलस्थानं आहेत. जुन्या आठवणींनी तेव्हा मिळालेल्या सुखाची, आनंदाची स्मृती जागते; पण आज मात्र ते हरवल्याची जाणीव बेचैन करते. किरवाणी राग ऐकावासाही वाटतो आणि एका क्षणी तो नकोसाही वाटू लागतो. देशमुखांच्या लिखाणात हे प्रतीत होतं! ते लिहितात, ‘कधी कधी अचानक डोळ्यांसमोर काही दृश्यं दिसू लागतात. संध्याकाळची वेळ आहे. गायी, वासरे चरून घरी परतत आहेत. गल्लीत घराच्या वाड्यांच्या ओट्यावर माणसं बसली आहेत. गप्पा सुरू आहेत. कुणी हातात माळ घेऊन कसला तरी जप करीत आहे. आडावर कुणी पाणी शेंदत आहे. आडालगतच्या दगडावर या वेळी पण कुणी बाई धुणं धुवत आहे. हातातल्या फुलपात्रात धान्य व पंचपाळ घेऊन काही बायका देवीच्या मंदिराकडे जात आहेत. गल्लीत एका बाजूला मुले आणि दुसऱया बाजूला मुली खेळताहेत. अचानक ते दृश्य धुसर होते. डोळ्यात धूळ गेली आहे की काय? डोळे चोळतांना हात ओले होतात. धूळ कुठली? पाणी जमा झालेले असते डोळ्यांच्या कडांशी! ते पुसत असताना कुणीतरी मोबाईलवर लावलेले गाणे कानावर पडते – आया हैं मुझे फिर याद वो जालीम गुजरा जमाना बचपन का. हाय रे अकेले छोडके जाना और न आना बचपनका..’
रजत प्रकाशनची निर्मिती अजून आकर्षक होऊ शकली असती. साध्या पेहराव्यातल्या जिनियस व्यक्तीकडं लोकांचं लक्ष कसं जावं?

आडगावचे दिवस
 लेखक – निळकंठ देशमुख
 प्रकाशक – रजत प्रकाशन
 मूल्य-  रु. 225 n पृष्ठे–  120.