
>> वैश्विक, khagoldilip@gmail.com
खगोलशास्त्राचा, विशेषतः त्यातील आकाशदर्शनाचा अभ्यास करताना गेली अनेक वर्षे आम्हाला अमावस्येचं महत्त्व कळलंय. इतकी काळोखी निरभ्र रात्र इतर कुठली असणार? त्यामुळे शक्यतो अमावस्या किंवा त्यांच्या आसपासच्या शनिवारी (प्रेक्षकांच्या सोयीनुसार) आमचे खगोल मंडळाचे रात्रभराचे कार्यक्रम होत असतात. तसं पाहिलं तर आपल्या परंपरेतही ‘सण’ म्हणून अनेक अमावस्यांना महत्त्व आहेच. पिठोरी, दिव्यांची किंवा दिवाळीतली अमावस्या साजरी केली जाते.
काल हा लेख लिहिताना अमावस्याच होती आणि हा काळोखी रात्रीचा दिवस उजाडला तोच एका ‘लखलखीत’ यशस्वी प्रयोगाने. सकाळी सहापासून टीव्हीवर ती यशोगाथा पाहताना बरं वाटत होतं. ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ ऊर्फ ‘इस्रो’च्या यशात उत्तरोत्तर वाढ होत असताना कालचं ‘शतकी’ उड्डाण पाहताना आनंद होत होता. ‘इस्रो’ने 10 ऑगस्ट 1979 रोजी ‘रोहिणी’ उपग्रह मालिकेतलं पहिलं उड्डाण केलं. त्या वेळीही पत्रकारितेत होतोच. ‘इस्रो’च्या पुढच्या अनेक प्रकल्पांच्या यशापयशाच्या गोष्टी समजून घेत होतो. अशा व्यापक प्रकल्पात यश तर महत्त्वाचं असतंच, पण अपयशही बरंच काही शिकवून जातं. मात्र अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जे कष्टसाध्य यश मिळतं तो सर्व संशोधकांच्या बुद्धिमत्तेचा गौरव असतो. कालच्या ‘इस्रो’च्या शंभराव्या उपग्रह उड्डाणाने तेच यश अधोरेखित केलंय.
‘इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सिस्टिम’ ऊर्फ ‘एनव्हीएस’ मालिकेतला ‘जिओस्टेशनरी’ किंवा ‘जिओसिक्रोनस’ म्हणजेच ‘भूस्थिर’ कक्षेतला ‘नॅविक’ हा सेकंड जनरेशन आणि अंतराळात 36800 किलोमीटर अंतरावरून, हिंदुस्थान आणि आसपासच्या 1500 किलोमीटर भूभागावर अवकाशातून सातत्याने नजर असलेला उपग्रह सोडण्यात यश प्राप्त केलं ते 29 जानेवारी 2025 रोजी. हेच ‘इस्रो’ उपग्रहाचं शतक महोत्सवी उड्डाण ठरलं. यावरची ‘नॅविक’ (नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन) सिस्टिम ‘जीपीएस’सारख्या सिस्टिमसारखीच प्रभावी ठरणार आहे. अनेक सॅटेलाइटस्च्या समूहातून (कृत्रिम नक्षत्र) ही सिस्टिम कार्यरत होईल आणि त्यामधील ‘ऍटोमिक’ घडय़ाळाद्वारे अतिशय तंतोतंत वेळ दर्शविली जाईल. याचा उपयोग कालांतराने मोबाईलसाठीही होऊ शकेल.
आता थोडं ‘इस्रो’ पूर्वीपासूनच्या आपल्या ‘अंतराळी’ कार्यक्रमांविषयी. 1962 मध्येच डॉ. होमी भाभा यांच्या प्रेरणेतून ‘डिपार्टमेन्ट ऑफ ऍटॉमिक एनर्जी’अंतर्गत अवकाश कार्यक्रमालाही आरंभ झाला. त्या वेळी त्याला ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ किंवा ‘इन्कॉस्पार’ म्हटलं जायचं. देशाचे अंतराळ विज्ञानाचे जनक विक्रम साराभाई त्याविषयी आग्रही होते आणि प्रधानमंत्री नेहरू यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्या काळात देशाच्या गंगाजळीत असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याइतका प्रचंड पैसा नव्हता, परंतु प्रत्येक राष्ट्राला स्वयंपूर्णतेकडे जाताना विविध क्षेत्रांत कार्यारंभ करावाच लागतो. कारण असे प्रकल्प वर्षानुवर्षांच्या संशोधन परिश्रमानंतर आकाराला येत असतात. ही कमिटी आधी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च’चा भाग होती. अणुशक्ती विभागाचे डॉ. भाभा त्यात खूप सहाय्य करत होते.
सुरुवातीच्या काळात ‘इन्कॉस्पार’तर्फे केरळमधील ‘थुम्बा’ येथील ‘रॉकेट लॉन्चर पॅड’वर प्राथमिक स्वरूपाची ‘रॉकेट’ कशी सोडली जायची आणि त्यांचे भाग कधी सायकलवरून तर कधी बैलगाडीतून कसे न्यावे लागायचे याचे ऐतिहासिक फोटो हा मार्ग किती खडतर होता याची साक्ष देतात. त्या काळात तरुण इंजिनीअर असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम (जे पुढे देशाचे राष्ट्रपती झाले) यांचं योगदानही महत्त्वाचं होतं. ‘थुम्बा’च्या इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशनवरून आजही प्रायोगिक रॉकेट लॉन्च होत असतात. आपल्या पहिल्या ‘रोहिणी’ उपग्रहाची निर्मिती तिथेच झाली. रॉकेट उड्डाणासाठी इंधन (प्रॉपेलेन्ट) निर्माण करण्यात आपले मराठी संशोधक वामन दत्तात्रय पटवर्धन यांचंही मोलाचं योगदान आहे.
कालांतराने म्हणजे 15 ऑगस्ट 1969 रोजी ‘इन्कॉस्पार’चं रूपांतर ‘इस्रो’मध्ये होऊन त्यांचं मुख्यालय बंगळुरू येथे गेलं. उपग्रह उड्डाणासाठी देशाच्या पूर्व किनाऱ्यावरचं श्रीहरिकोटा हे ठिकाण निश्चित झालं. तेथूनच ‘इस्रो’ने अनेक विक्रमी उपग्रह आणि अवकाशयानं सोडली. आपले ‘आर्यभट्ट’ ‘भास्कर’ वगैरे सुरुवातीचे कृत्रिम उपग्रह रशियाच्या मदतीने अंतराळात झेपावले. 1984 मध्ये राकेश शर्मा रशियन यानातूनच पहिले हिंदुस्थानी अंतराळवीर म्हणून अवकाशात जाऊन आले.
नंतरच्या काळात ‘भूस्थिर’ कक्षेतील उपग्रह सोडण्यासाठी लागणारं रॉकेट उड्डाणातलं ‘क्रायोजेनिक इंजिन’ (इंधन अतिशीत – 173 अंश ठेवणारं) बनवण्यासाठी किंवा त्यासाठीच्या इंधनासाठी जगाने मदत केली नाही. ते आव्हान स्वीकारून आपल्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे क्रायोजेनिक इंजिन तयार केलं आणि ‘इस्रो’ भराऱ्या घेऊ लागलं. आतापर्यंत आपल्या देशाने तसे, इतर अनेक देशांसाठी मिळून 500 पेक्षा जास्त (548) उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. परंतु ते जगातील विविध लॉन्चपॅडवरून. श्रीहरिकोटा येथील 100 व्या रॉकेटचं उड्डाण झालं ते ‘भूस्थिर’ कक्षेतील 17 वा उपग्रह सोडण्यासाठी. या वेळी ‘इस्रो’चे अध्यक्ष बी. नारायणन यांनी सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. यापुढे देशातील जनता चंद्रावर माणूस उतरवणे तसेच ‘गगनयान’सारखं ‘स्पेस स्टेशन’ अंतराळात सोडणे या इस्रोच्या भावी उपक्रमांना शुभेच्छाच देईल.