
>>डॉ. नीलम ताटके
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो असे संवेदनशील व्यक्ती मानतात. समाजाचे देणे काही प्रमाणात फेडण्याची संधी पुण्याच्या एका आर्टिस्टने उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम नेमका काय आहे हे जाणून घेऊ. पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले या संवेदनशील जोडप्याच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू झाला व गेली 20 वर्षे तो यशस्वीपणे चालू आहे. समाजात अनेक संस्था समाजातील वंचित घटकांसाठी काम करतात आणि अनेक गरजू व्यक्तींचे प्रश्न सोडवतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आह़े अशा संस्थांना ‘देणे समाजाचे’ हे एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख समाजाला प्रदर्शनाच्या माध्यमातून करून देणे, त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजाला ऋण फेडण्याची संधी देणे. 2005 ते 2025 या 20 वर्षांच्या कालावधीत जवळपास 300 सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थांना सुमारे 22 कोटींहून अधिक जास्त निधीची मदत मिळाली. यामुळे त्यांचे अनेक उपक्रम उभे राहिले.
या उपक्रमात सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी केली जात नाही. उलट त्यांना सर्व सेवा विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांची निवड वीणा गोखले स्वतः भेट देऊन, काटेकोरपणे पारखून निवडतात, जेणेकरून योग्य संस्थांना मदत मिळेल. दानशूर व्यक्ती आणि संस्था यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला हा उपक्रम 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीदरम्यान मुलुंड येथे होणार आहे. महाराष्ट्र सेवा संघ, जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर मुलुंड पश्चिम येथे हा कार्यक्रम होत आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आणि अनेकविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजसेवी संस्था सहभागी होणार आहेत. या संस्था बीड, बार्शी, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सांगोला, अमरावती, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, पेण या भागांतून आलेल्या आहेत. त्यांची कार्यक्षेत्रे ही अनेकविध आहेत. या वर्षी 22 संस्थांना संधी मिळणार आहे. त्यामुळे लोकांनाही पुणाचे काम प्रभावी वाटले आणि पुणाला मदत करणार ठरवता येईल. या प्रदर्शनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, परंतु संस्थांचे काम पाहून मदत करण्याची इच्छा होते.






























































