आभाळमाया – यशस्वी अंतराळी कारकीर्द!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक

19 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेल्या सुनीता विल्यम्स (पंडय़ा) या मूळ हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळयात्री अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र ‘नासा’ तर्फे 27 वर्षांच्या कारकीर्दीत अनेकदा अंतराळात जाऊन आल्या आणि 27 डिसेंबर 2025 रोजी अंतराळसेवेतून निवृत्त झाल्या. त्याची अधिकृत घोषणा 20 जानेवारी 2026 रोजी झाली आणि एका महिलेच्या प्रदीर्घ अंतराळी कारकीर्दीची यशस्वी सांगता झाली. त्यांच्या निवृत्तीच्या वेळी ‘नासा’चे व्यवस्थापक जेरेड आयझॅकमन यांनी सुनीताचं वर्णन ‘ए ट्रेलब्लेझर इन हय़ुमन स्पेसक्लाइट’ म्हणजे, मानवी अवकाश प्रवासामधल्या मार्गदर्शक असं केलं.

2024 मध्ये ‘स्टारलायनर’ यानातून अवघ्या आठवडय़ाभरासाठी अंतराळस्थानकावर गेलेल्या सुनीता, तांत्रिक अडचणींमुळे तिथे तब्बल 18 मार्च 2025 पर्यंत अडकून पडल्या. अर्थात, अंतराळ स्थानकाला ‘माहेर’ समजणारी त्यांच्यासारखी धडाडीची अंतराळवीर त्यामुळे बिलकूल डगमगली नाही. परतीचा प्रवास कधी? या अनिश्चिततेच्या काळातही त्यांनी इतर अंतराळ सहयात्रींसमवेत अनेक वैज्ञानिक प्रयोग केले. तिथे त्यांची प्रकृती बिघडली आहे का, अशा वावडय़ा उठल्या. परंतु त्यांनी अवकाशातून संवाद साधत आपण ठणठणीत असल्याचं दाखवून दिलं आणि ‘माझी मुलगी धीराची आहे’ असं सांगणाऱ्या त्यांच्या आई असुर्लिन बॉनी-पंडय़ा यांचे शब्द त्यांनी सार्थक ठरविले! अशा या यशस्वी अंतराळकन्येला तिच्या यशस्वी कारकीर्दीविषयी सदिच्छा देताना त्या कारकीर्दीचा एक आढावा घेऊ.

अमेरिकेतल्या ओहायो राज्यातील युक्लिड येथे जन्मलेल्या सुनीता यांचे वडील दीपक पंडय़ा हे प्रसिद्ध न्यूरोऍनॉटॉमिस्ट होते. तीन भावंडांपैकी सुनीता सर्वात लहान. मोठा भाऊ जय आणि बहीण दीना यांच्यानंतरचा त्यांचा जन्म. हिंदुस्थानी पदार्थांपैकी सामोसा त्यांची आवडती ‘डिश.’ घरी या मुलीला ‘सुनी’ म्हणत.

1983 मध्ये पदवी मिळवल्यावर सुनीताने 1987 मध्ये फ्लोरिडा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून 1995 मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1987 पासून त्या अमेरिकन नौदलात दाखल झाल्या. 1989 मध्ये नौदलातच हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट क्वॉड्रन-3 मध्ये त्यांची नेमणूक झाली. नौदलाला हवाई संरक्षण देणाऱ्या या पथकातून त्यांनी ऍन्ड्रय़ु चक्रीवादळाच्या काळात कामगिरी बजवली. 1993 च्या डिसेंबरमध्ये त्या नौदलाच्या ताफ्यातील विमानचालक झाल्या. 2017 मध्ये कॅप्टन म्हणून त्यांनी अमेरिकन नौदलातली कारकीर्द पूर्ण केली.

त्यानंतरचा त्यांचा अंतराळी भरारी घेणारा प्रवास त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेला. 1998 मध्ये जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर 9 डिसेंबर 2006 रोजी त्यांची ‘डिस्कव्हरी’ यानातून अंतराळात जाण्यासाठी एक्थिडिशन-14 च्या पथकात निवड झाली आणि एप्रिल 2007 मध्ये त्यांचं स्वप्न सत्यात उत्तरलं! 16 एप्रिल 2007 रोज त्या अंतराळातून ‘मॅरॅथॉन’ करणाऱ्या पृथ्वीवरच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. बॉस्टनमधल्या मॅरॅथॉनबरोबरच त्यांनी अंतराळ स्थानकातील ‘ट्रेडमिल’वर 42-48 किलोमीटर ‘धावून’ 4 तास 24 मिनिटात त्यांनी ही ‘दौड’ अनुभवली. या काळात त्यांनी पृथ्वीशी थेट ‘नातं’ तर जोडलंच, पण आपली क्षमताही सिद्ध केली. त्याचं चित्रण युटय़ुबवर उपलब्ध आहे. सुनीता ज्यावेळी स्पेस स्टेशनच्या ‘मॅरॉथॉन’मध्ये ट्रेडमिलवर धावत होत्या त्याच वेळी त्यांची बहीण बॉस्टन येथील मार्गावर धावत होती आणि सुनीता यांचे सहकारी या दोघींना ‘चिअर्स’ करून प्रोत्साहन देत होते.

2026 मध्ये अंतराळ कारकीर्दीची निवृत्ती येईपर्यंत सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात व्यतीत केले, म्हणजे त्यांचा एकूण अंतराळ निवास सुमारे  पावणेदोन वर्षांचा होता. 2012 मध्ये त्या अंतराळ स्थानकाच्या कमान्डर झाल्या. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला. नंतर त्यानी बोइंग आणि स्पेस-एक्सच्या व्यावसायिक यानांच्या उड्डाणासंदर्भात अंतराळयात्रींना प्रशिक्षण दिलं. सुनीता यांनी एकूण 62 तास ‘स्पेसवॉक केले.

5 जून 2024 रोजी सुनीता यांनी पायलट म्हणून विल्मोअर यांच्यासह अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं. त्याचवेळी हे अंतराळयात्री कसेबसे अंतराळस्थानकावर पोचल्यानंतर ‘स्टारलायनर’मध्ये गडबड झाली आणि त्यांचा आठवडय़ाभरचा अंतराळा निवास अनिश्चित काळासाठी लांबला. असं काहीतरी केव्हातरी घडेल याची शक्यता लक्षात घेऊन अंतराळ स्थानकावर अतिरिक्त सदस्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केलेली असल्याने विल्यम्स आणि विल्मोअर निश्चिंत होते. धाकधुक वाटत होती ती पृथ्वीवासीयांनाच.

शेवटी ही तितिक्षा (सहनशीलता) फळाला आली. प्रतीक्षा संपली आणि ‘स्पेस एक्स क्रू-9’च्या इतर अंतराळयात्रींसह सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोअर 18 मार्च 2025 रोजी सुखरूप पृथ्वीवर परतले. या सर्व अंतराळयात्रींचं अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील फ्लोरिडा राज्याच्या टॅलॅहॅसीजनच्या समुद्रात ‘जलावतरण’ झालं आणि सारं जग आनंदलं.

पृथ्वीवरच्या अशा मोजक्याच माणसांना संपूर्ण मानवसमूहाचं प्रेम आणि काळजी लाभते. सुनीता विल्यम्स-पंडय़ा यांना हे भाग्य लाभलं आणि त्यांच्या कारकीर्दीची यशस्वी सांगता झाली. त्यांचे वडील हिंदुस्थानी म्हणून आपल्याला त्यांचे विशेष कौतुक. यापुढे त्या चंद्र आणि मंगळाकडे जाणाऱ्या ‘अर्टेमिस’ प्रकल्पासाठी कार्यरत असतील.

[email protected]