भ्रमंती – जंगलप्रसाराचा आगळा ध्यास

>> निलय वैद्य

पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचा शिष्य, जंगल छायाचित्रकार आणि पर्यटक अमोल हेंद्रे यांनी भारतीय जंगलांचा प्रचारप्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा वसा घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. कसे ते अमोल यांच्याकडून जाणून घेऊया

जंगलातून भटकंती करणे, वन्यजिवांचा अभ्यास करणे, छायाचित्रण करणे हे अनेकजण वर्षानुवर्षे करत आले आहेत. अमोल हेंद्रे यांनी आपला कॅमेरा गळ्यात अडकवून भारतातली जंगलं पालथी घातली आहेत. तसंच दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, युगांडा, केनिया, टांझनिया, श्रीलंका या देशातल्या जंगलातून भटकंती केली आहे. वेगवेगळ्या देशातले दूतावास, तिकडच्या संबंधित संस्था, नेचर क्लब, फोटोग्राफी क्लब, शासकीय वनखाते या ठिकाणी भेटी देत, तिथे नेटवर्किंग करत त्या मंडळींना भारतातल्या जंगलांविषयी ते माहिती देतात. परदेशी पर्यटक भारतातल्या जंगलात कसे येतील याविषयी प्रयत्न करतात. आपली हौस आपल्यापुरती न ठेवता तिला समाजभानाचं अस्तर त्यांनी लावलं आहे.

वन्यजीवनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक आदानप्रदान करणं ही संकल्पना काय आहे?

ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. असा प्रयत्न यापूर्वी कोणी केला असेल असं माझ्या माहितीत तरी नाही. हा उपक्रम समजण्यापूर्वी माझी थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. शाळेपासून मी जंगलऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा भक्त. त्यांना यंदा, 2025 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची जंगलाविषयीची सर्व पुस्तकं मी अनेकदा वाचली आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आधी महाराष्ट्रात अन् भारतात जंगलभ्रमण सुरू केले. सुरुवातीला मी एकटाच फिरायचो, फोटोग्राफी करायचो. मी काढलेले फोटो पाहून हळूहळू माझे मित्र आकर्षित होऊ लागले. माझा हुरूप वाढला. मग मी त्यांच्यासोबत जंगले पालथी घालायला सुरुवात केली. तरी याविषयातली माझी भूक काही शमेना. पुढे मी विदेशातल्या जंगलांची भटकंती सुरू केली. यात माझे वरिष्ठ डॉ.  प्रा. चेतन पोंक्षे, संतोष यादव, झंकार गडकरी, डॉ अभंग प्रभू, डॉ. प्रा. मनीषा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. इंडोनेशियामधील बाली, श्रीलंकेतील कोलंबो, केनिया, युगांडा, दक्षिण आफ्रिका, इस्रायल, लेक नाकुरू, नैवाषा, अबर डेअर, मसाईमारा, सामोसीर ही जगभरातली जंगलं धुंडाळली. तिथे मनसोक्त फोटोग्राफी केली. या अनुभवाने मला वेडं केलं. ते एक अनोखं विश्व आहे. त्याचा संपूर्ण मागोवा घेण्यासाठी माझे शंभर जन्म अपुरे आहेत.

पण यामुळे जंगलाविषयी सांस्कृतिक आदानप्रदान कसं झालं?

जगातल्या कानाकोपऱ्यात भटकंती करत असताना, फोटोग्राफी करत असताना, जंगलं अभ्यासत असताना वेगवेगळे प्राणी, आदिवासी माणसं भेटली, झाडं, पानं भेटली. त्यांची भाषा, जीवनमान, चालीरीती, खाणंपिणं अभ्यासता आले. त्याची मी नोंद केली. या कालावधीत माझं देशीविदेशी नेटवर्क मस्त तयार झालं होतं. मी भारतीय पर्यटक असूनही त्यांच्या जंगलांचा अभ्यास करतोय, प्रचार-प्रसार करतोय याचे त्यांना नवल वाटले. त्यांनी माझे आणि माझ्या कामाचे स्वागत केले. मी परदेशी जंगलप्रेमींना भारतातल्या जंगलांची वैशिष्टय़े सांगितली. फोटो प्रेझेंटेशन केले. ते पाहून त्यांनी भारतातल्या  व जगातल्या जंगलांचे फोटोंचे प्रदर्शन आमच्या देशात का भरवत नाहीस, असं विचारलं. त्यानुसार मला मदतही केली.

या फोटोग्राफी प्रदर्शनांना कसा प्रतिसाद मिळाला?

सर्वप्रथम इंडोनेशियाने त्यांच्या पर्यटन खात्याद्वारे माझ्या फोटोचे प्रदर्शन बाली येथे भरवले. त्यांना माझ्या बंगाल टायगर्सचे फोटो प्रचंड आवडले. नंतर ते भारतात जंगलं पाहायला आले. महाराष्ट्र पर्यटन आणि भारत पर्यटन विभागाला जोडून दिले. बालीतली प्रतिष्ठित ‘तमन देदारी आर्ट गॅलरी’ चाहत्यांनी ओसंडून वाहिली. मग मला श्रीलंका दूतावासातून संपर्क करण्यात आला. त्यांनी त्यांच्या मुंबईतल्या कार्यालयात प्रदर्शन भरवलं. त्याचा प्रतिसाद पाहून त्यांनी मला कोलंबोत निमंत्रित केले. अशा प्रकारे जंगलाच्या माध्यमातून भारताचे इतर देशांशी सांस्कृतिक आदानप्रदान सुरू झाले.

नजीकच्या काळात नवीन कोणते प्रकल्प येऊ घातले आहेत?

यंदा नोव्हेंबर महिन्यात मी लेक तोबा येथील सामोसिरमध्ये एक परिषद आयोजित करणार आहे. विषय आहे, ‘बंगाली टायगर आणि सुमाट्रन टायगर’. यासाठी मी भारतीय पर्यटकांना तिथे नेणार आहे. या परिषदेमुळे जागतिक जंगलप्रेमींना भारतातल्या वाघांबद्दल माहिती मिळेल. अशा प्रकारे आचारविचारांची देवाणघेवाण होईल. ऑगस्ट मध्ये ‘ग्लोबल वाईल्ड लाईफ नेटवर्किंग समिट’ मी करणार आहे.

[email protected]