एक दिवस असा येईल की हॉर्नची गरजच भासणार नाही !

पुण्यामध्ये 12 सप्टेंबर रोजी हॉर्न न वाजवता वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या ‘नो हाँकींग डे’ ला समाजातील सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय.  अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू अजिंक्य पाटील यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. अजिंक्य डी.वाय.पाटील यांनी  सामना ऑनलाईनसाठी यानिमित्ताने एक विशेष लेख लिहला आहे.  

आपल्या हाँकिंग सिस्टीम आपल्या डेबिट कार्डाशी जोडलेल्या असत्या तर आतापर्यंत आपण सर्व जण दिवाळखोर झालो असतो. आज, बहुतेक शहरांमध्ये रस्त्यावरील वाहतूक हे ध्वनी प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण बनले आहे. साधारणतः, वाहतुकीचे प्रमाण व वेग वाढला की आवाजाची पातळीही वाढत जाते. हाँकिंग ही कोणत्याही चालकाकडून सहजपणे होणारी कृती आहे. सारासार विचार करता, वाहनचालकाकडून दिवसातून 5-10 वेळा हॉर्न वाजवला जातो. गेल्या वर्षी, सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणाऱ्या आघाडीच्या 10 शहरांमध्ये दिल्ली  आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश होता. एका अहवालाद्वारे स्पष्ट झालंय की पुणेकर दिवसातून 1 कोटी वेळा हॉर्न वाजवतात. रस्त्यावरील अन्य व्यक्तीला सावध करणे व अपघात रोखणे, हे मुख्य उद्दिष्ट असलेला हॉर्न आता राष्ट्रीय संकट बनले आहे आणि ध्वनी प्रदूषण वाढीस लागायला ते एक महत्वाचे कारणही बनले आहे.

कर्णकर्कश्य आवाजामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे आत्तापर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. ह्रदय विकार, निद्रानाश, मुलांमध्ये कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, चिडचिड, तणाव असे अनेक विकार ध्वनीप्रदूषणामुळे जडतात. इतकी गंभीर परिस्थिती असूनही, ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, सुदैवाने आता चित्र बदलू लागले आहे. लोकांमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी विविध देश प्रयत्न करीत आहेत. या उपायांमध्ये हॉर्न वाजवण्यास बंदी, हॉर्नविरोधी रॅली, अभियान असे विविध मार्ग अवलंबले जात आहेत. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रादेशिक वाहतूक कार्यालय (आरटीओ) व पुणे वाहतूक पोलीस विविध मार्ग शोधत आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे, 12 सप्टेंबरपासून, दर आठवड्याला ‘नो हाँकिंग डे’ सुरू करणे.

कायद्याचा धाक दाखवण्यापेक्षा लोकांनी जर स्वत: निर्बंध घातले तर योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होते. दंड आकारणे, शिक्षा देणे असे मार्ग अवलंबल्यास वाहनचालक चिडून जाऊन अधिक ध्वनीप्रदूषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वेच्छेने 12 सप्टेंबर रोजी नो हाँकिंग डे पाळणे अपेक्षित आहे. एक दिवस सजग पुणेकर विनाकारण हॉर्न वाजवणं सोडून देतील आणि  हा प्रयोग खरेच यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.  एक दिवस असा येईल की जेव्हा हॉर्नची गरजच भासणार नाही. तो दिवस लवकरच येईल, अशी अपेक्षा आहे.