लेख – महागाईचा मार, त्यावर दिखाऊपणाचा भार!

>> अजित कवटकर

‘वापरा-फेका-नवीन विकत घ्या’ हीच सध्याची जीवनशैली झाली आहे. यामुळे सतत निर्माण होणारी अमर्याद मागणी ही संसाधनांचा बेसुमार वापर करत पूर्ण केली जात आहे. मग आपले संपले की दुसऱयाचे ओरबाडायचे, लुटायचे आणि याच प्रवृत्तीने आज आपल्याला तिसऱया महायुद्धाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे. तेव्हा आजचा महागाईचा मार, त्यावर असणारा दिखाऊपणाचा भार आणि लोकसंख्यावाढ कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेलीच पाहिजेत.

नैसर्गिक व भौगोलिक वैविध्यतेमुळे प्रत्येक राष्ट्र एखाद्या संसाधनाने संपन्न, तर काही संसाधनांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत ही कमतरता आयातीच्या माध्यमातून दूर करता येते. मात्र यासाठी मोठय़ा प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते आणि त्यामुळे व्यापार संतुलन बिघडते ही बाब अर्थव्यवस्थेसाठी अयोग्य ठरते, पण याला इलाज नाही. कारण कोणतेच राष्ट्र संसाधनांच्या बाबतीत सर्वसंपन्न नाही. मग अशा परिस्थितीत परस्परावलंबन ही काळाची गरज झाली आहे. या अवलंबनाला काही प्रमाणात दूर करण्यासाठीच की काय, आज अनेक मोठी राष्ट्रे ही साम्राज्यवादाच्या महत्त्वाकांक्षेने विस्तारवादी पावले टाकत आहेत. विध्वंसक युद्धात सध्या होरपळत असलेल्या युव्रेनमध्ये प्रचंड खनिज संपत्ती असल्याचे बोलले जाते. युव्रेनवरील रशियाच्या आक्रमणामागील अनेक कारणांपैकी एक कारण ही संपत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनुष्याने विनाकारण वाढवून ठेवलेल्या अमर्याद गरजा, बेफिकीर अपव्यय आणि त्यातच दिखाऊपणाच्या आहारी जात असलेला मनुष्य प्राणी हा या सर्व नैसर्गिक संपदेला आजच संपवून मोकळा होण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. आपले ताट रिकामे होत असताना दुसऱयाच्या भरलेल्या ताटाकडे हपापलेल्या नजरेने बघण्याची लुटारू मानसिकताच आजच्या जागतिक अस्वस्थेला, अस्थिरतेला, अतिरेकाला कारणीभूत आहे. उपभोक्तावादामुळे संसाधनांचा अतिवापर आणि त्यातून महागाई भडकवली जात असताना दिखाऊपणाचा ट्रेण्ड आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. अव्यवहारी खर्चिकपणाची हीच लागण व्यापार व व्यवहाराला नियम चुलीत घालून भाववाढ करत राहण्याची प्रेरणा देत आहे. समाज हा दिखाऊपणाच्या आहारी गेला असल्याकारणाने किमती किती जरी वाढल्या तरी मागणी व उपभोग कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे संसाधनांचा बेसुमार वापर आणि त्यातून महागाईची अमर्याद वाढ या संयोजनातून अराजकता निर्माण झाली नाही म्हणजे झाले! आज जगावर घोंगावणारे मंदीचे सावट याच अतिरेकाचे फळ आहे.

मागणी व पुरवठा यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने किमती निर्धारित होत असतात किंवा वस्तू व सेवांच्या किमती या मागणी आणि पुरवठय़ामधील तफावतीत झुलत असतात. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यास सदर वस्तू वा सेवेची दरवाढ होणे स्वाभाविक आहे, परंतु आज मागणीपेक्षा पुरवठा फार अधिक झाला तरी वाढलेल्या किमतींमध्ये आवश्यक तेवढी तुलनात्मक घसरण होत नाही. असे दिसण्यात येत आहे की, उत्पादक व विव्रेत्यांना किमती वर खेचायला फार आवडते, परंतु जेव्हा त्या खाली उतरविण्याची अर्थशास्त्राrय परिस्थिती निर्माण होते, तेव्हा मात्र हात आखडता घेतला जातो. तेव्हा किमती जरूर घसरतात, परंतु तेवढय़ा प्रमाणात नाही जेवढय़ा त्या खाली उतरणे अपेक्षित वा आवश्यक असते. मागणी कमी झाली किंवा पुरवठा अधिक झाला तरी किमती खूप पडू द्यायच्या नाहीत यासाठी ‘हार्ंडग्ज – मार्पेटिंग’च्या साहाय्याने भाववाढीची परिस्थिती पुन्हा निर्माण होईपर्यंत वेळ मारून नेण्याचे प्रयत्न केले जातात. आपल्या देशाच्या लोकसंख्येचे विस्पह्टक प्रमाण पाहता किमती या वरच्या स्तरावरच स्थिर ठेवणे अवघड राहिलेले नाही.

दिखाऊपणा हा मानवाचा स्वभावगुण होय. अगदी प्राचीन काळापासून भौतिकवादी समाजात आपले श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठी मानव हा आपल्या संपत्तीचे प्रदर्शन मांडत आला आहे. यशाच्या प्राबल्याची क्रमवारी मांडण्यासाठी ऐश्वर्याचे हेच प्रदर्शन, निकष म्हणून अलिखितपणे समाजाने स्वीकारले. हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी यांनी मढवलेले, सजवलेले राजवाडे यांपासून ते हजारो कोटींचे लग्न समारंभ हे आपली पत व प्रस्थ अधिक शक्तिशाली करून समाजातील आपले निर्विवाद श्रेष्ठत्व भक्कम करण्यासाठीच केले गेले वा केले जातात. क्षमता, सामर्थ्य, शक्ती दाखवून देणाऱया पृतींचे अनुकरण हे नेहमीच होत आले आहे आणि त्यामुळे आज स्तरास्तरावर वरचढपणाची स्पर्धा लागलेली दिसते. उपभोक्तावादाला बळ देणारी हीच मानसिकता आज चंगळवादाला कारणीभूत आहे. यातूनच अनावश्यक वा आवश्यकतेहून अधिक उपभोग होताना दिसतो. प्रत्येक उद्योगामध्ये अशा काही ब्रॅण्डेड वस्तू व सेवा असतात जे ‘अल्ट्रा प्रिमियम’ किमतीत विकल्या जातात. ‘हाय स्टेट्स सिम्बॉल’ म्हणून बघितल्या जाणाऱया या वस्तू व सेवांच्या मागणीला कधीच तुटवडा भासत नाही. अशी अतिमहागडी वस्तू मिळविण्यासाठीच मुळी आज सगळ्यांची धडपड चाललेली दिसते. आजच्या युगात नवीन हे दोन दिवसांतच जुने होते आणि नावीन्याला जुने करणारे नव नावीन्य प्राप्त करणेच जीवन उद्देश होतो. दुरुस्त करणे, पुनर्वापर करणे, पुनः चक्रीकरण करण्यासारख्या गोष्टी करून वस्तू दीर्घकाळ टिकवून वापरात ठेवणे याकडे कमीपणा, गरिबी, मागासलेपणा म्हणून बघितले जाते. ‘वापरा-फेका-नवीन विकत घ्या’ हीच सध्याची जीवनशैली झाली आहे. यामुळे सतत निर्माण होणारी अमर्याद मागणी ही संसाधनांचा बेसुमार वापर करत पूर्ण केली जात आहे. मग आपले संपले की दुसऱयाचे ओरबाडायचे, लुटायचे आणि याच प्रवृत्तीने आज आपल्याला तिसऱया महायुद्धाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे.

आपण मुक्त अर्थव्यवस्थेतील लोकशाहीप्रधान देशात संपूर्ण स्वातंत्र्यात जगतो. तेव्हा न्याय, नियमांच्या चौकटीत राहून केलेल्या कोणत्याही पृतीवर कोणीही आक्षेप वा निर्बंध आणू शकत नाही. परंतु आज संसाधनांच्या रूपात जीवनाची शाश्वती संपवली जात असताना महागाईमुळे जगणेच मुश्कील होत असताना आणि या सगळ्याचे परिणाम विघातकच असणार असल्याची खात्री असताना सरकारने विकासाच्या पडद्याआड राहून बघ्याची भूमिका घेणे अयोग्य आहे. महागाई रोखण्यासाठी, अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकारतर्फे राबवली जाणारी वित्तीय व चलनविषयक धोरणे आज प्रभावहीन ठरताना दिसत आहेत. या अपयशामागील असंख्य कारणांपैकी जे सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या लोकसंख्येचे भयावह प्रमाण. जगात आपण सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत, ही बाब जर सरकारला भूषणावह वाटत असेल तर त्याहून मोठी लाजिरवाणी गोष्ट नाही. आज आपल्या देशाला सहन करावी लागणारी सगळी दुखणी ही अनियंत्रित लोकसंख्यावाढीमुळे आहेत. लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी सरकारतर्फे काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे असेच सुरू राहिले तर भाववाढ आणि संसाधनांचा अतिवापर, दुरुपयोग, अपव्यय होतच राहणार. लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी, संसाधनांचे वितरण व वापर नियोजनबद्ध काटकसरीने व्हावे यासाठी सरकारने कडक उपाययोजना करणे अपरिहार्य आहे. सगळेच निर्णय, सगळीच धोरणं ही राजकीय लाभाच्या दृष्टिकोनातून होणार असतील तर ही लाचारी देशाचे अपरंपार नुकसान करणारी आहे. आज जगात मंदीची लाट आणि युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. या जरी जागतिक समस्या असल्या तरी येथील लोकसंख्येच्या दृष्टीने त्या आपल्याला अधिक भेडसावणार आहेत. तेव्हा आजचा महागाईचा मार, त्यावर असणारा दिखाऊपणाचा भार आणि लोकसंख्यावाढ कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेलीच पाहिजेत.