लेख – उन्मादाकडून उत्तरदायित्वाकडे… हीच वेळ!

>> अनिता दिलीप यादव

आता वेळ आली आहे उन्मादातून, जात्यंधतेतून, अयोग्य धर्मांधतेतून बाहेर येण्याची, हिमतीने झाल्या गोष्टींचे उत्तरदायित्व घेण्याची. स्वधर्माचा अभिमान बाळगणे व कोणी त्याचा अपमान केल्यास त्याला शिक्षा देणे वेगळे व सरसकट शिरकाण करणे वेगळे. ‘त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारले’ हा बाणा बाळगून तो व मी समपातळीवर येतो हे कधी समजणार आपल्याला? धर्मांध कोणताही असो, तो अंतिमतः समाज विघातकच ठरतो.

सध्या देशात घडणाऱ्या, विशेषतः भारत-पाकिस्तान दरम्यानच्या घडामोडींकडे संवेदनशीलतेने पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. सर्वाधिक लष्करी अस्तित्व असलेल्या प्रदेशांपैकी एक असलेल्या जम्मू-कश्मीरमध्ये पाक प्रशिक्षित दहशतवादी घुसून कसा हल्ला करू शकतात? या हलगर्जीपणाची जबाबदारी अजूनपर्यंत कोणी का घेतलेली नाही?

2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या महाभयंकर हल्ल्यात भारताचे 40 सैनिक हुतात्मा झाले. परंतु या हल्ल्याआधी गुप्तचर खात्याने दिलेले 11 इशारे का दुर्लक्षिले गेले? या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या अपराधाची जबाबदारी कोणाची होती? हेदेखील आजपर्यंत जनतेला समजलेले नाही. कारण प्रसारमाध्यमांनी बालाकोट हल्ल्यानंतर फाजील राष्ट्रभक्तीचा आव आणून केलेले अँकरिंग. आता सहा वर्षांनंतर पुन्हा तेच घडतंय. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची क्षणचित्रं म्हणून काही वृत्तवाहिन्यांनी गाझाचं जुनं फुटेज वापरलं. या बातम्या सांगताना वापरली जाणारी भाषा निव्वळ सनसनाटी होती. युद्धासारख्या भयंकर विषयाला प्रेक्षकांसाठी स्वस्त मनोरंजन म्हणून उपलब्ध करून देणारी होती. पुन्हा हे पाहणारा प्रेक्षक, उन्मादी होणारा प्रेक्षक कोण? …तर युद्धामुळे ज्याचं घर जळणार नाही, ज्याचं माणूस मरणार नाही, ज्याच्या घरात येणारी वीज, पाणी, अन्न थांबणार नाही तो होता. सूड उगवण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या घरावर बॉम्ब पडणार नसतात.

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पूंछ भागात सीमेजवळ गोळीबार केला. त्यात 13 निरपराध कश्मिरींचा बळी गेला. गेली पाच वर्षे इथली कुटुंबे बऱ्यापैकी शांततेत राहत होती. कारण तेथे युद्धविराम होता. अचानक एका रात्रीत त्यांच्या आयुष्यात भयंकर उलथापालथ झाली. आपल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान काहीतरी गडबड नक्कीच करणार याचा विचार करून हल्ल्यापूर्वी सीमेजवळची गावे रिकामी का केली गेली नाहीत? उन्मादी चॅनेल व त्यांच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांना हा प्रश्न पडला नाही का? गंभीर गोष्ट म्हणजे माझ्याकडे धुणंभांडी करणाऱ्या मुलीनेही मला हा प्रश्न विचारला, जिने कधी शाळेचे तोंड पाहिले नाही किंवा राजकारण कशाशी खातात हे तिला माहीत नाही. तिचा प्रश्न वरवर सर्वसामान्य वाटला तरी जिवाला, जगण्याला महत्त्व देणारा होता, जे तिला कळतं ते आपल्याला न कळण्याएवढे आपण मूकबधिर झालो आहोत? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीपुढे झुकलेल्या वृत्तवाहिन्या आपल्याला तेच देतात जे त्यांना द्यायचे असतं. प्रश्न असा आहे की, सामान्य माणूस कधी जागा होणार? समाजमाध्यमे आणि चॅनेल्सपुढे अंध होणे आपण कधी सोडणार? या सर्वांनी केलेल्या जांगडगुत्त्यातून आपण स्वतःला कधी सोडवणार? सीमेवरचा सैनिक राजकारण्यांचा वा आपला वेठबिगार नसून ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे हे आपल्याला कधी समजणार? आपल्यापेक्षा तो मोलाचा आहे. आपल्यासाठी तो असतोच. पण प्रश्न असा आहे की, आपण आहोत का त्याच्यासाठी? आपल्या डोळ्यांनी, आपल्या सारासार बुद्धीने कधी चालणार आपण? देश सैनिकांच्या हवाली केला की, आपण हात वर करायला मोकळे. हा शिरस्ता कधी मोडणार आपण? किती जण सैनिक शहीद झाले की, निदान त्या पूर्ण दिवशी तरी सुतक बाळगतात? किती जण मनातून खरोखर व्यथित होतात? किती जणांना घास कडू लागतो त्या दिवशी? ‘बुंद बुंद से सागर बनता है’ या न्यायाने आपण प्रत्येकाने स्वप्रयत्नाने यातून बाहेर यायला हवे अन्यथा शोकांतिका दूर नाही.

कुठलाही पूर्वग्रह न बाळगता अतिशय कळकळीने मी लिहिले आहे. या लेखातील काही संदर्भ मुक्त पत्रकार पार्थ एम. एन. यांच्या ‘युद्धस्य कथा’ या लेखातून घेतले आहेत. आता वेळ आली आहे उन्मादातून, जात्यंधतेतून, अयोग्य धर्मांधतेतून बाहेर येण्याची, हिमतीने झाल्या गोष्टींचे उत्तरदायित्व घेण्याची. स्वधर्माचा अभिमान बाळगणे व कोणी त्याचा अपमान केल्यास त्याला शिक्षा देणे वेगळे व सरसकट शिरकाण करणे वेगळे. ‘त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारले’ हा बाणा बाळगून तो व मी समपातळीवर येतो हे कधी समजणार आपल्याला? धर्मांध कोणताही असो, तो अंतिमतः समाज विघातकच ठरतो. अशा धर्मांधांना ठेचणे योग्यच, परंतु त्यासाठी सरसकट उन्मादाने काय भले झाले आपले? आपली ताकद वाढवणे गरजेचे, परंतु ती सरसकट सर्वांना ठेचण्यासाठी नाही, तर अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी असावी.

आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या विचारांनी संयमी, सशक्त, संवेदनशील भारत बनवू शकतो यावर आपण दृढ विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी प्रथम आपल्याला राजकारण्यांकडे, प्रसारमाध्यमांकडे, समाजमाध्यमांकडे गहाण पडलेली आपली सदसद्विवेक बुद्धी सोडवून घ्यावी लागेल. आपल्याला प्रश्नं पडायला हवेत. त्यांची उत्तरे मिळवण्याची, पाठपुरावा करण्याची चिकाटी बाळगावी लागेल. कारण प्रश्नच विचारले नाहीत तर घाण्याचा झापडबंद बैल व आपल्यात फरक राहणार नाही. अशा प्रजेला मग कुठेही, कसंही हाकत नेता येऊ शकतं. मला तरी वाटतं आता आपले भविष्याचे दोर आपण स्वतःपासून आपल्या हाती घेतले पाहिजेत. आपल्याला कोणी हाकणार नाही तर राजकारण्यांना आपण नियंत्रित केले पाहिजे. हीच लोकशाहीची खरी गरज नाही का?

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)