
>> अतुल जोशी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे नाव गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर फारसे नव्हते, परंतु आधीची चार दशके काँग्रेस पक्षाच्या सत्तावर्तुळात सुरुपसिंग नाईक या नावाशिवाय सत्तेचा सारीपाट हलत नसे. सुरुपसिंग नाईक हे काँग्रेसच्या अत्यंत जुन्या पिढीतले कमालीचे निष्ठावंत. त्यातही इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याचे सच्चे पाईक ही त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख होती. इंदिराजींपासून राहुल गांधींपर्यंतच्या पिढ्यांशी त्यांचे हे घट्ट नाते कायम राहिले. आताच्या नंदुबार जिल्ह्यातील नवापूर या आदिवासी तालुक्यातील नवागाव या छोट्या पाड्यात जन्मलेल्या सुरुपसिंग नाईक यांची राजकीय कारकीर्द नवागावच्याच सरपंचपदापासून सुरू झाली. खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण झाल्यावर सामाजिक कार्याकडे आधीपासूनच कल असलेले सुरुपसिंग राजकारणाकडेच वळले. 1962चा तो काळ राज्यात नव्हे, तर देशातच काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे सुरुपसिंग नाईकही काँग्रेसचेच कार्यकर्ते, नेते बनले. सरपंचपदानंतर नवापूर पंचायत समिती, पुढे 1972 मध्ये पहिल्यांदा नवापूर मतदारसंघातून आमदार, 1977 मध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा प्रवास झाला. अर्थात, राज्यातच रस असल्याने 1980 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा लढवली. ते फक्त आमदारच झाले नाहीत, तर त्या वेळच्या काँग्रेस सरकारात कॅबिनेट मंत्रीही झाले. तेव्हापासून मुख्यमंत्री कोणीही असले तरी मंत्रिमंडळात ‘सुरुपसिंग नाईक’ हे नाव 2009 पर्यंत अढळ राहिले. 2009 मध्ये त्यांचा डॉ. विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा पराभव केला, परंतु त्यामुळे त्यांचे पक्षातील आणि गांधी कुटुंबाकडील राजकीय वजन कमी झाले नाही. तसेच या धक्क्याने ते खचलेही नाहीत. उलट 2014 मध्ये त्यांनी शरद गावीत यांना पराभूत केले आणि पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता त्यांचे पुत्र शिरीष नाईक यांना निवडून आणले आणि मतदारसंघावरील त्यांची आणि काँग्रेसची पकड कायम ठेवली. त्या वेळच्या एकत्रित धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षांतर्गत सुरुपसिंग नाईक आणि रोहिदास पाटील यांचे दोन गट होते. तरीही पक्षश्रेष्ठीचे पारडे मात्र कायम सुरुपसिंग नाईक गटाकडेच झुकलेले राहिले. त्याकाळात काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारात इंदिरा गांधींची महाराष्ट्रातील पहिली सभा हमखास नंदुरबार-नवापूर येथेच होत असे. हे केवळ सुरुपसिंग नाईकांमुळेच होत असे. आणीबाणीनंतर असंख्य बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, परंतु सुरुपसिंग नाईक इंदिराजींशी निष्ठावान राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक मंत्रिमंडळात सुरुपसिंग हमखास असत, परंतु तरीही पक्षांतर्गत राजकारणात सुरुपसिंग यांच्याकडे कायम ‘पक्षश्रेष्ठीचा माणूस’ म्हणूनच पाहिले गेले आणि त्यांनीही कधीच पवार समर्थक अशी भूमिका घेतली नाही. ते आणि पाच-सहा टर्म्स सलग खासदार राहिलेले माणिकराव गावीत हा एकत्रित धुळे जिल्ह्यात प्रदीर्घ काळ प्रभावी गट होता. सुरुपसिंग नाईक यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळली. वनमंत्री म्हणून तर ते प्रदीर्घ काळ होते. अर्थात, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या रांगा जंगलतोडीमुळे ओसाड झाल्या, प्रसिद्ध ‘तळोदा सागवानी जंगल’ साफ झाले, असेही आरोप सुरुपसिंग यांच्यावर त्या काळी विरोधकांनी केले होते. मात्र त्यामुळे त्यांच्या सत्तेतील आणि काँग्रेसमधील स्थानाला कधी धक्का लागला नव्हता. अर्थात, गेल्या दशकभरात मात्र राज्यातील बदललेली राजकीय स्थिती आणि वयपरत्वे सुरुपसिंग नाईक हे राजकीय जीवनात फारसे सक्रिय राहिले नव्हते. तीन वर्षांपूर्वी खासदार माणिकराव गावीत काळाच्या पडद्याआड गेले. आता सुरुपसिंग नाईकही गेले. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील एक ‘निष्ठावान पर्व’ त्यामुळे संपले आहे.



























































