
<<< लीना गाडगीळ >>>
काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपली आई ही आपली प्रथम गुरू असते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आई म्हणजे ईश्वराचे रूप,आई म्हणजे निःस्वार्थ प्रेमाचे स्वरूप, आई म्हणजे वात्सल्यसिंधू,आई म्हणजे संरक्षण कवच. आईचे ऋण हे कधीच फेडता येत नाही. जगरहाटीप्रमाणे वडिलांनी मुलांच्या पालनपोषणासाठी कष्ट करून पैसे आणणे व आणलेल्या पैशांतून आई आपल्या मुलांचे पालनपोषण करत असते. हे करत असताना ती मुलांना संस्कारदेखील देत असते. आपल्याला काही लागलं किंवा वेदना झाली तर आपण ‘आई गं’ म्हणतो म्हणजेच आईची आठवण काढतो व आपल्याला बरे वाटते. आई ही आईच असते. मग ती कोणाची का असेना! अगदी प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत. ती आपल्या मुलांची काळजी घेते.
दिवसेंदिवस माणूस आईचे ऋण विसरून तिला गृहीत धरू लागला आहे. आम्हाला जन्म दिला आहे म्हणजे आमची सर्व जबाबदारी आई-वडिलांवर आहे. लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्या बायकोच्या आई-वडिलांना आपल्या घरात आणतो व आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो. जेव्हा ते आई-वडील होतात तेव्हा त्यांना आपल्या आई-वडिलांची अडचण वाटते व ते त्यांना आश्रमात किंवा दोन भाऊ असतील तर काही कालावधीसाठी एकाकडे व काही कालावधीसाठी दुसऱ्याकडे पाठवतात. आई-वडील वस्तू नाहीत. ती माणसे आहेत, त्यांनाही भावना आहेत. त्यांना मुलांचा पैसा नको असतो, तर चार क्षण प्रेमाचे हवे असतात. मुलांना शिकून सवरून मोठे केल्यावर ती आई-वडिलांना सोडून परदेशात स्थायिक होतात. इकडे आई-वडील मात्र त्यांचा आवाज ऐकण्यासाठी व त्यांना पाहण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहत असतात. त्यांचा फोन आला की, त्यांना पुढील काही दिवस मुलांची वाट पाहण्याची शक्ती मिळते.
आजच्या जगात पैशाला सर्वश्रेष्ठ मानले जात आहे व ते कमावण्यासाठी ते आईवडिलांना सोडून जातात. त्यामुळे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीला येण्याची तसदीसुद्धा मुलं घेत नाहीत. पैसे पाठवून कोणाला तरी अंत्यविधी करायला सांगतात. ज्या घरात आई-वडिलांच्या डोळ्यांतून पाणी येते त्या घरात कधीच सुख, शांती, समाधान, आरोग्य नांदत नाही. वडील एकवेळ क्षमा करणार नाहीत, पण कितीही चुका केल्यात तरी आई आपल्या मुलांना क्षमा करते. क्वचित प्रसंगी ती वडिलांना विरोध करते.
आईप्रमाणेच आपली कुलदेवी ही आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करत असते. आपल्या पूर्वजन्माची पुण्याई म्हणून आपण विशिष्ट कुळात जन्म घेतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी आपली कुलदेवी आपल्याला मदत करून आपली साधना करून घेते म्हणून सतत तिचे नामस्मरण करणे हे जरुरी आहे. आपली कुलदेवी आपल्यात कमी असलेल्या देवतत्त्वाचे पूर्णत्व करते. तिच्या कृपेमुळे आपल्या कुळाचा उद्धार होतो.
आई, कुलदेवी याचप्रमाणे आपली एक माता, जननी असते ती म्हणजे आपली मातृभूमी. आज आपल्या देशात अनेक आक्रमणे होत आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आहे. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करून देशाचं संरक्षण करणे. ही काळाची गरज समजून आपण सर्वांनी योग्य पावले उचलली पाहिजेत.