>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
युक्रेन युद्धाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. दीर्घकाळ रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेन आता आक्रमक भूमिका घेत आहे. एका धाडसी निर्णयात युक्रेनने रशियाच्या सीमेवर असलेल्या कुर्स्क प्रांतात सैन्य पाठवले. इतक्या दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर कब्जा जमवला होता. मात्र युक्रेनने कुर्स्कवर केलेला हल्ला ही रणनीतीची एक नवीन दिशा दर्शवितो. या हल्ल्यामागे युक्रेनचा उद्देश स्पष्ट आहे, तो म्हणजे रशियाला वाटाघाटींच्या टेबलावर आणणे.
कुर्स्क प्रांतात युक्रेनच्या सैन्याने मिळवलेल्या प्रारंभिक यशाने जगभरात खळबळ उडाली आहे. रशियन सीमेच्या आत युक्रेनचे सैनिक पोहोचणे हा रशियासाठी एक मोठा धक्का आहे. युक्रेनच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे रशियन सैन्य, पुतीन सरकार आणि रशियाच्या गुप्तहेर यंत्रणा आश्चर्यचकित झाल्या.
अर्थात हा हल्ला यशस्वी ठरेल की नाही हे येणारा काळच सांगेल. रशियाने या हल्ल्याला तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही बाजूंकडून मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होत आहे. युक्रेनचा कुर्स्कवरचा हल्ला हा युद्धाच्या भविष्याची दिशा ठरवणारा असू शकतो. जर युक्रेन या हल्ल्यात यशस्वी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण युरोपच्या सुरक्षेवर होऊ शकतो.
स्वतःचे पारंपरिक नौदल नसतानाही युक्रेनने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाच्या शक्तिशाली ‘ब्लॅक सी फ्लीट’ला मोठा धक्का दिला आहे. युक्रेनने अत्याधुनिक ड्रोन आणि मिसाईल तंत्रज्ञानाचा वापर करून रशियन नौदलाला गंभीर नुकसान पोहोचवले आहे. विशेषतः, युक्रेनने रशियाच्या ‘मिसाईल कॉर्वेट इवानोवेट्स’ या युद्धनौकेला बुडवून रशियन नौदलाचे मनोधैर्य खचवले आहे. युक्रेनने हे यश अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळवले आहे. ‘मागुरा व्ही 5 सागरी ड्रोन’, ‘नेपच्यून ऑण्टिशिप मिसाईल’ आणि ‘सी बेबी नेव्हल ड्रोन’ यांसारख्या शस्त्रांचा वापर करून युक्रेनने रशियन नौदलावर प्रहार केला आहे. त्यामुळे ‘ब्लॅक सी फ्लीट’चे मोठे नुकसान झाले आहे आणि ते आता कार्यक्षमतेने काम करण्यास असमर्थ झाले आहे. युक्रेनचे हे यश त्याच्या डिजिटल परिवर्तन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रतीक आहे. युक्रेनने सिद्ध केले आहे की, शक्तिशाली सैन्याच्या विरोधातही बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान वापरून यशस्वी लढा दिला जाऊ शकतो.
रशियाच्या कुर्स्क प्रांतात युक्रेनच्या सैन्याने 7 ऑगस्ट रोजी एक धाडसी हल्ला केला. युक्रेनमधील सुमी शहरातून निघालेल्या या सैनिकांनी रशियन सीमा ओलांडून सुझा शहराजवळ पोहोचून रशियन सैन्याला चकित केले. हल्ल्याच्या तीव्रतेमुळे कुर्स्क प्रांतातील 76 हजार नागरिकांना आपले घर सोडून पलायन करावे लागले. रशियन सरकारला या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणीबाणी जाहीर करावी लागली. कुर्स्कच्या गव्हर्नर यांनी वीसपेक्षा अधिक शहरे आणि गावे युक्रेनच्या ताब्यात गेल्याची माहिती दिली आहे. अनपेक्षित हल्ल्यामुळे रशियन सरकार चक्रावले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कोणतीही पूर्वतयारी नसल्याने अनेकांना मोठय़ा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. हा हल्ला रशियन सैन्याच्या कमकुवत बाजू उघड करतो.
युक्रेनने रशियाविरुद्धच्या युद्धात ब्रिटनकडून मिळालेल्या ‘चॅलेंजर 2’ रणगाडय़ांचा वापर सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटिश वृत्तपत्रांच्या मते, हे रणगाडे कुर्स्क प्रदेशात युक्रेनच्या हल्ल्यात सहभागी झाले आहेत. युक्रेनच्या 82 वा एअर ऍसॉल्ट ब्रिगेडने या रणगाडय़ांसह रशियन सीमा ओलांडली आहे.
ब्रिटनने युक्रेनला दिलेल्या शस्त्रांचा वापर स्वसंरक्षणासाठी करण्याची मुभा दिली आहे. मात्र ‘चॅलेंजर 2’ रणगाडय़ांच्या वापरामुळे रशिया आणि पश्चिमेकडील देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रशियाने युक्रेनच्या चार प्रांतांवर कब्जा जमवला असला तरी युद्धात निर्णायक विजय मिळवू शकलेला नाही. ‘चॅलेंजर 2’सारखे शक्तिशाली रणगाडे रशियाच्या युद्ध रणनीतीला मोठा धक्का देऊ शकतात. या रणगाडय़ांची शक्तिशाली तोफ आणि मशीनगन युक्रेनच्या सैन्याला मोठे फायदे देऊ शकतात.
युक्रेनने कुर्स्कवर केलेला हल्ला केवळ एक सैनिकी कारवाई नाही, तर युद्धाच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. यामागे दोन प्रमुख कारणे दिसून येतात. पहिले, युक्रेनच्या पूर्वेकडील लढाईच्या मैदानातून रशियन सैन्याचे लक्ष विचलित करून कुर्स्ककडे वळवणे. कुर्स्कवरील हल्ल्याची योजना अतिशय गुप्तपणे आखण्यात आली होती . युक्रेनच्या या आक्रमक रणनीतीला तोंड देण्यासाठी रशियाला नवीन युद्धतंत्रे आखावी लागतील.
युक्रेनच्या कुर्स्कवरील हल्ल्याला रशियाने तीव्र प्रतिसाद दिला आहे. रशियन अध्यक्ष पुतीन यांनी या हल्ल्याला पाश्चिमात्य देशांचा कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, पाश्चिमात्य देश युक्रेनच्या माध्यमातून रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या रशिया युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर नियंत्रण ठेवून आहे. मात्र युक्रेनच्या अपेक्षेनुसार रशियाने कुर्स्कच्या युद्धभूमीवर मोठय़ा प्रमाणात सैन्य पाठवलेले नाही. सध्या कुर्स्कचा बचाव स्थानिक सैनिकांच्या मदतीनेच सुरू आहे. युक्रेनला कुर्स्क शहर ताब्यात घ्यायचे असल्यास त्यांना अजून बराच प्रवास करावा लागेल. यासाठी युक्रेनला मोठय़ा प्रमाणात सैन्य आणि शस्त्रास्त्रांची गरज भासणार आहे.
गेल्या वर्षी युक्रेन मोठय़ा प्रचारानंतरही प्रतिहल्ला मोहीम सुरू करू शकला नव्हता. मात्र या वेळी युक्रेनने गुप्तपणे योजना आखून रशियन सीमेवर हल्ला चढवला. या यशस्वी कारवाईमुळे युक्रेनचे मनोबल वाढले आहे. कुर्स्कवरील हल्ल्यामुळे युद्धाचे भविष्य अनिश्चित झाले आहे. मात्र रशियानेही या हल्ल्याला तीव्र प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येणाऱया काळात युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. युक्रेनला अधिक विध्वंसक आणि लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रs देण्याची इच्छा असूनही अमेरिका किंवा जर्मनीला ती देता येत नाहीत. कारण यास या दोन्ही देशांचा युद्धातील थेट सहभाग मानून अधिक तीव्रतेने हल्ले करण्याची किंवा युद्धाची व्याप्ती वाढवण्याची पुतीन यांची धमकी आहे.
अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यास तेथून मदतीचा ओघ थांबणार आहे. त्यामुळे येणाऱया काळामध्ये आपली युद्धक्षमता लांब युद्धाकरिता टिकवून ठेवणे हे युक्रेनसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.