>> दिलीप देशपांडे
बेरोजगारी, वाढती व्यसनाधीनता हा सध्या युवकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो मात्र बाजूला पडत आहे. जसा शिक्षित युवक आहे त्यासमोर नोकरीचा प्रश्न आहे. तसेच जो शेतीत गुंतलेला आहे त्याच्यासमोर शेती पिकवणे आणि ती टिकवून ठेवणे हा यक्षप्रश्न आहे.
आपण म्हणतो देशाच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती आहे. भारत हा जगातील सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे. भारतात 65 टक्के युवकांची संख्या आहे, असे म्हटले जाते. युवा पिढीच्या क्षमतेवर, ताकतीवर भारतही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आजच्या परिस्थितीत काही ठरावीक युवा पिढीत नवीन शिकण्याची आवड आहे, जिद्दही आहे. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे.
जागतिक युवा दिवस साजरा करत असताना युवकांशी निगडित काही विषय, प्रश्नांची चर्चा होणे आवश्यक वाटते.
आजचा युवक इंटरनेट, मोबाईल, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियाच्या जाळ्यात नको तितका अडकला आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हवा तेवढा उपयोग न घेता नको तेवढा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात युवक त्यात अडकून आत्ममग्न झालाय.
कलाकार, खेळाडू, सेलिब्रिटींना मोठय़ा रकमेचा मोबदला देऊन ऑनलाईन गेमच्या जाहिराती केल्या जातात व तरुणांना आकर्षित केले जाते. हे गेम म्हणजे एक जुगारच असतो. तरुणांना विधायक कार्याकडे ओढण्याऐवजी हे असले प्रकार तरुण पिढीची दिशा बदलून टाकत आहे आणि त्यांच्याभोवती अशा गेमचा विळखा घातला गेला आहे. त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे. या गोष्टीकडे गंभीरपणे बघितले गेले पाहिजे आणि अशा प्रकारांवर बंदी आणायला हवी आहे. अनेक राज्यांत यावर बंदी आहे. सरकारला त्याची आवश्यकता वाटत नाही का?
संवाद कमी होतोय, वाचन कमी झालंय. काही वेळेला युवकांमध्ये वैचारिक क्षीणता आल्याचे जाणवते. नवीन तंत्रज्ञान मिळतंय, सगळं जग जवळ आलंय, पण माणसं हरवली आहेत. मीडियाचा योग्य वापर करण्याची समज नाही. म्हणून वाटते विधायक वळण द्यायला हवे. राजकीय पक्ष तरुणांचा वापर निवडणूक कामी मोठय़ा प्रमाणावर करून घेतो. त्या बदल्यात काय मिळते? अनेकांचे आयुष्य दिशाहीन झाले आहे. रोजगार नसलेले लाखो युवक त्यात गुरफटले आहेत. आंदोलन, मोर्चे या कामीच त्यांचा फक्त वापर वर्षानुवर्षे करून घेतला जातोय ही गंभीर बाब आहे. त्यातच त्याच्या सामाजिक जाणिवा लोप पावत आहेत.
खरं तर युवाशक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदाच्या जयंतीलाही आपण राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांना युवा शक्तीवर खूप विश्वास होता. युवा शब्दातच वायू म्हणजे गती आहे. त्यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति व समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित आहे. युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींची चर्चा, सर्व क्षेत्रांतील युवकांना, युवा संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवीत. युवकांची ‘मन की बात’ ओळखायला हवी. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवनवीन संधी प्राप्त करून द्यायला हव्यातच. हाच त्यावर एकमेव उपाय आहे, नाही तर राष्ट्राची ताकद म्हणून ज्या युवकांकडे आपण पाहतो ती युवा पिढी राजकारण, सोशल मीडिया, व्यसनाच्या फेऱयात बरबाद होणार हे निश्चित. बेरोजगार, व्यसनाधीन युवकांचा देश व्हायला वेळ लागणार नाही.
शासनाने व राजकीय नेत्यांनी युवा शक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे, हेच देशाचे खरे भांडवल आहे. म्हणूनच त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे.
एकूणच युवा पिढीला चांगले शिक्षण, योग्य ती दिशा आणि मार्गदर्शन मिळायला हवे. प्रामुख्याने युवा पिढीच्या प्रश्नांवर विचार व्हायला हवा. ठिकठिकाणी युवकांचे मेळावे आयोजित करून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावले पाहिजेत. राजकीय स्वार्थासाठी युवक व्यसनाधीन होणार नाही ही दक्षता घ्यायला हवी.