ठसा – विक्रम गायकवाड

>> दिलीप ठाकूर

दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तच्या वादळी आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट निर्माण करीत असतानाची गोष्ट. चित्रपट रसिकांच्या मनात संजय दत्तची प्रतिमा घट्ट बसलीय आणि आजही संजय दत्त रूपेरी पडद्यावर कार्यरत आहे. अशा वेळेस त्याची भूमिका साकारणारा कलाकार त्याच्यासारखाच दिसायला हवा, इतकेच नव्हे तर रसिकांकडून ‘संजू’ स्वीकाराला जायला हवा. हे आव्हान रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी स्वीकारले आणि यशस्वी करून दाखवले. त्यांनी रणबीर कपूरला ‘संजू’ म्हणून रूपडं दिले आणि रणबीर कपूरने ‘दिसायला नि वागायला’ही असा संजय दत्त पडद्यावर साकारला तो रसिकांनी स्वीकारला. या यशात विक्रम गायकवाड यांचा वाटा अतिशय मोठा. रवींद्र जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ या चरित्रपटात सुबोध भावेला बालगंधर्व यांच्या रूपात सजवणे असेच आव्हानात्मक. स्त्राr रूपातील बालगंधर्व दाखवण्यात कसब व कसोटी होती. त्यात सुबोध भावे व विक्रम गायकवाड हे दोघेही यशस्वी ठरले. आपल्या अशा उल्लेखनीय रंगभूषेसाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेल्या विक्रम गायकवाड यांचे 10 मे रोजी मुंबईत निधन झाले. अतिशय मेहनती, अतिशय शांतपणे सतत नवीन आव्हाने स्वीकारण्यात तत्पर, इतरांना कायमच मदतीचा हात देण्यात पुढे आणि आपल्या रंगभूषा (मेकअप) या कलेविषयी अतिशय अभिमान वाटणारे असेच विक्रम गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील झगमगाटात वावरूनही अजिबात फिल्मी न झालेला असा हा अवलिया. अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे हे विक्रम गायकवाड यांचे गुरू. ते विक्रम गायकवाड यांना शाळेत मुलांच्या मेकअपसाठी घेऊन जायचे. तेव्हा गायकवाड सातवीत होते. त्यांनी सांगितल्यानुसार गायकवाड यांनी चिमण्या, गाढव, मोर, पोपट असा मेकअप मुलांना केला.

त्यानंतर एकांकिका, लोकनृत्य, संगीत नाटक स्पर्धांसाठी ते मेकअप करायला लागले. दहावीत असताना त्यांनी सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मेकअप केले आहेत. या कलेवरचे त्यांचे प्रेम, ती अधिकाधिक प्रमाणात जाणून व शिकून घेण्याची त्यांची वृत्ती याचा त्यांना आपल्या चौफेर व अष्टपैलू वाटचालीत उपयोग झाला. चित्रपटाच्या बाबतीत त्यांनी जास्त प्रमाणात ऐतिहासिक व चरित्र या प्रकारचे चित्रपट केल्याचे दिसते. यात अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखेनुसार रंगभूषा करणे सोपे नसते. त्यासाठी भरपूर वाचन करणे, अनेक तपशील व संदर्भ मिळवणे, दिग्दर्शकाशी खोलवर चर्चा करणे आणि कलाकारांकडून सहकार्य मिळवणे आवश्यक असते. विक्रम गायकवाड यांनी आपल्या सकारात्मक दृष्टिकोन व कामावरचा पूर्ण पह्कस यातून ते मिळवले. रंगभूषा करताना त्यांना वाटे की आपल्यासममोर एक मूर्ती आहे. त्या मूर्तीची पूजा करायची आहे. तिला नटवायचं आहे. त्यांनी कायम या भावनेने काम केले. अशा भावनेने काम केल्यावर ते छानच होते, असे ते म्हणत.

विक्रम गायकवाड यांनी या क्षेत्रात येण्यास आईचा विरोध होता. त्यांच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले. यादरम्यान विक्रम गायकवाड आंजीबाबू यांजकडे आले. हेही त्यांचे गुरू. त्यांनी विक्रम यांना पुण्यातील दूरदर्शन व चित्रपट प्रशिक्षण संस्थेत नेले. त्यांचा असिस्टंट म्हणून त्यांनी काम केले. राम कदम यांनी पठ्ठे बापूराव यांच्यावर आधारित ‘पवळा’ हा चित्रपट केला. त्यात अशोक शिंदे यांना 80 वर्षांचे दाखवायचे होते. टिश्यू वापरून नर्गिसला म्हातारे दाखवल्याचे विक्रम गायकवाड यांनी वाचले होते. त्यांनी तो प्रयोग करायचे ठरवले आणि त्यातून विक्रम यांचा आत्मविश्वास वाढला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात मामुटीला आंबेडकरांच्या रूपात बदलण्याचे काम विक्रम गायकवाड यांनीच केले. ‘बेल बॉटम’ या चित्रपटात लारा दत्ताने साकारलेल्या इंदिरा गांधी या मेकअपसाठी विक्रम यांनी इंदिरा गांधी यांची छायाचित्रे, भाषणाचे व्हिडीओज पाहिले. लारा दत्ता आणि इंदिरा गांधी यांच्या चेहऱयात काहीच साम्य नसतानाही त्यांनी उत्तम काम केले. हे श्रेय त्यांचेच.

विक्रम गायकवाड यांनी स्पेशल इफेक्ट्स इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूयॉर्क आणि रिसर्च कौन्सिल ऑफ मेकअप आर्टिस्ट्स इंक, लंडन येथे परीक्षा दिल्या. त्यांनी मेकअप कलाकार रिक बेकर यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतले. पुण्यात विक्रम गायकवाड यांची स्वतःची मेकअप प्रशिक्षण संस्था सुरू असून या संस्थेत फक्त शहरी मुलीच नाही तर ग्रामीण भागातील मुलीही प्रवेश घेऊ शकतात. ग्रामीण भागातील मुलींसाठी 60टक्के राखीव जागा आहेत विक्रम गायकवाड यांना ‘मोनार मानुष’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यानंतर, त्यांना ‘बालगंधर्व’, ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. झगमगाटी चित्रपट पुरस्कारांत रंगभूषाकार, हेअरस्टाईलीश, वेशभूषाकार यांच्यासाठी पुरस्कार असावा असे त्यांना नेहमीच वाटे. रंगभूषाकार म्हणून विक्रम गायकवाड यांनी आपल्या विविधरंगी कामाचा उठवलेला ठसा कायमच स्मरणात राहील.

[email protected]