आरोग्य – रसायन चिकित्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

सध्या वजन कमी करण्यासाठी अनेक आधुनिक उपाय प्रचलित आहेत, परंतु आयुर्वेदातील नियमांनुसार आहारविहार असल्यास व त्यानुसार उपाय असल्यास अपेक्षित परिणाम नक्कीच साधता येतो.

डॉक्टर !! एक चपाती, थोडासा भात एवढेच माझे दोन वेळचे जेवण आहे. मध्ये काही खातही नाही तरी वजन का कमी होत नाही? पोटाची चरबी का वाढते आहे? यावर समाधान होणारी उत्तरे फक्त आयुर्वेद देऊ शकतो. त्यासाठी हा लेख प्रपंच!

रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे सात धातू आयुर्वेदात वर्णन केले आहेत. ज्यामुळे शरीर बनले आहे.

हे सर्व धातू स्वत स्वतचे पोषण करतात. ते करण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे पचन करणारे अग्नी आहेत. जसे की, वेगवेगळ्या चुलीच! त्याला आम्ही धात्वग्नी असे म्हणतो. जठराग्नी हा प्रमुख पचन करणारा अग्नी अन्नावर प्रक्रिया करतो आणि नंतर त्यातील पोषक अंश या सप्त धात्वग्नीकडे पाठवून दिले जातात. प्रत्येक धातू स्वतला पोषण करण्यासाठी त्या अन्नावर प्रक्रिया करतात आणि आपल्या आवश्यक असलेला भाग काढून उरलेला भाग मल स्वरूपात बाहेर पडतो. ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया सामान्य भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मग एक चपाती खाऊन मेद वाढतो कसा हे आपण पाहू. जसे की, चूल पेटवण्यासाठी फुंकर मारावी लागते तसेच अग्नी प्रज्वलित राहण्यासाठी वात दोष फुंकर मारण्याचे काम करत असतो. त्याच्यात जर काही विकृती झाली तर तो फक्त मेदासारख्या एकाच धात्वग्नीला प्रज्वलित करतो आणि अन्नाचा बराचसा भाग मेद तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यासाठी वाढलेल्या वात दोषाचा योग्य प्रकारे उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचकर्म चिकित्सा अत्यंत उपयुक्त ठरते.

परंतु सध्या वजन कमी करण्यासाठी अनेक आधुनिक उपाय प्रचलित आहेत, ज्यात अन्न, स्निग्ध पदार्थ कमी करून वात वाढविण्याचे काम केले जाते आणि मेद कमी न होता वाढत राहतो. त्यासाठी वात दोष आणि धात्वाग्नी चिकित्सा करणे महत्त्वाचे ठरते.

या रसरक्तादी सप्तधातूंची चिकित्सा म्हणजे रसायन चिकित्सा. याला आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदात रसायन म्हणजे केमिकल नव्हे. रसादी धातूंचे अयन म्हणजे पोषण याला रसायन चिकित्सा म्हणतात. योग्य आहार, विहार, औषधे, पंचकर्म चिकित्सा कराव्या लागतात.

प्रत्येक धातूचे स्वतचे वैशिष्टय़ आहे. त्यांचे योग्य पोषण होत असेल तर मनुष्य निरोगी असतो. साधारण सप्तधातू योग्य असण्याची लक्षणे तुम्हीसुद्धा निरीक्षण करू शकता. उदाहरणार्थ, रसरक्त धातू सुस्थितीत असले तर त्वचा निरोगी, सतेज दिसते. मांस, मेद योग्य असेल तर शरीर बांधेसूद, बळकट सांधे दिसून येतात. शरीराची बांधणी योग्य दिसून येते. अस्थींचे पोषण होत असेल तर हाडे बळकट असतात, बळकट दाट केस दिसतात. नखांची चांगली वाढ होत असते.

मज्जा धातूचे योग्य पोषण होत असेल तर बुद्धिमत्ता दिसून येते आणि महत्त्वाचा धातू शुक्र धातू. त्याचे योग्य पोषण होत असेल तर चेहऱयावरचा ओज, तेजस्वीपणा दिसून येतो. संतती चांगली असते. ही ढोबळमानाने केलेली परिमाणे आहेत.

याचबरोबर रक्तादी धातूंच्या कमतरतेमुळे अनेक विकृत लक्षणे आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत, त्यायोगे रोगांचे योग्य निदानही करता येते. कुठलाही व्याधी झाला की, पहिल्यांदा वात, पित्त, कफ दोषांमध्ये असमानता येऊन धातूंमध्ये बिघाड दिसू लागतात आणि त्याच्या कमतरतेची लक्षणे शरीर दाखवते. म्हणून या सर्व गोष्टींचे अत्यंत महत्त्व आहे. ऋतूनुसार शरीरशुद्धी, गुळवेल, च्यवनप्राश, त्रिफळा इत्यादी अनेकविध औषधे योग्य निदानानंतर वैद्य वापरतात.

प्रत्येक धातूचे किती महत्त्व आहे ते एका उदाहरणाने पाहू. संतती होत नाही म्हणून अथवा लैंगिक दुर्बलता असेल तर शुक्र धातूची पुष्टी होणे आवश्यक असते. तो या सप्तधातूंमधील सर्वात शेवटचा धातू आहे. त्यामुळे सर्व धातूंची पुष्टी झाल्यावर शुक्र धातू पुष्टी करावी लागते.

प्रकृतीविषयी रुग्णाला कुठलाही प्रश्न पडला तर त्याला उत्तर देण्यासाठी आयुर्वेदाचा भरभक्कम आधार आहे. अधिक माहितीसाठी आपण पुढील लेखांमध्ये प्रत्येक धातूविषयी सविस्तर विचार करू या.