
>> डॉ. अनंत देशमुख
समकालीन राजकीय घटनांवर भाष्य करणारी कविता आपल्याकडे फार पूर्वीपासून लिहिली गेली आहे. खरे तर तिची मुळे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘कीचकवध’, ‘भाऊबंदकी’ या नाटकांपर्यंत जाऊन पोहोचते. कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’, ‘जा जरा पूर्वेकडे’, ‘जालियनवाला बाग’ या कवितांचे स्मरण होते. हिंदुस्थान-चीन युद्ध, बांगलादेशची निर्मिती, आणीबाणी पर्व या घटनांवर कविता लेखन झाले आहे. कवी अशा कवितांमध्ये तो या समाजाचा एक अटळ घटक असल्याने त्याच्या संवेदनशील मनावर सभोवतालच्या परिस्थितीचे, सामाजिक-राजकीय घटनांचे संदर्भ घेऊन तिरकस भाष्य करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. किंबहुना, अशी प्रतिक्रिया देणे हे त्याच्या कवी असण्याचा अपरिहार्य भाग असतो.
महेश केळुसकर यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यापूर्वीही व्यक्त करून स्वतवर रोष पत्करला होता आणि जाच अनुभवला आहे. अलीकडच्या काळात तर त्यांनी सातत्याने अशा प्रकारचे लेखन चालू ठेवले आहे. कारण आताही त्यांचे बहिर्मुख, संवेदनशील कविमन स्वस्थ राहत नाही. शिवाय आजकाल समाज जीवनात इतकी व्यामिश्रता, गुंतागुंत आणि भिन्न भिन्न अनाकलनीय वृत्ती-प्रवृत्तींचा कोलाहल वाढला आहे की, त्याला प्रतिसाद दिल्यावाचून त्या मनाला राहवत नाही.
महात्मा गांधी हे एक असामान्य, लोकोत्तर व्यक्तिमत्त्व. पूर्वकालीन आणि समकालीन बुद्धिमंतांनी राजकीय विचारवंतांनी, विश्लेषकांनी अनेकांगांनी मते व्यक्त केलेली आहेत. गांधीजींची हत्या ही कोणाही सुबुद्धाचे मन अस्वस्थ करणारी घटना आहे. केळुसकर यांचे मनही त्यामुळे बेचैन होते. हीच नव्हे तर एकूणच हत्या हा विषयच असा आहे की, त्यामुळे माणूस अत्यंत हळवा होतो.
राजकारणात भिन्न भिन्न राजकीय विचार प्रणाली समाजमानसात दिसून येतात. निरोगी लोकशाहीचे ते लक्षण मानता येते. यातूनच अनेक वृत्ती-प्रवृत्तीचे लोक पक्षाच्या छत्राखाली एकत्र येतात. पण ही मंडळी वेगवेगळ्या थरांतील, मानसिक घडणीची असतात. त्यांच्या आत्यंतिक टोकाच्या भूमिकांमुळे हत्या घडतात. या घटनांचा सर्व थरांतून निषेधही होत असतो.
अगदी गेल्या काही काळात नरेंद्र दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या होत आल्या आहेत. या मंडळींचे कुणाशीही वैयक्तिक मतभेद, वाद वा वैर नव्हते. त्यांच्या विचारसरणीला न पटणाऱयांकडून त्यांच्या हत्या घडल्या. समाजातील संवेदनशील व्यक्ती व्यथित झाल्या. विचार स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यात संकोच झाला. समाजातील विचारशील गट त्याविरोधात नेहमी आवाज उठवत आला आहे. या साऱया प्रकारावर भाष्य म्हणून महेश केळुसकर यांच्या सोबतच्या दोन कवितांमध्ये महात्मा गांधी यांची हत्या ही प्रतीकात्मक पद्धतीने आलेली आहे.
नाकात नथ घालायचा तो लहानपणी
पुढे त्याच्या नथीतून तीर मारला त्यानं आपल्या बापावर
संध्याकाळची प्रार्थना पण करू दिली नाही नेहमीची त्याने म्हाताऱयाला
…आणि म्हणे हिंदू होता तो.
पुनर्जन्मावर विश्वास होता त्याचा
म्हणायचा,
मी पुन्हा जन्म घेऊन गांधीना पुन्हा पुन्हा मारेन…
आता त्याने सकाळची वेळ निवडलीय
नको असलेल्या म्हाताऱयांना संपवण्यासाठी
आणि भेकड झालाय अधिकच
गोळ्या घालून पळून जातो मोटरबाईकवरून…
(मागच्या सीटवर बसून )
आणखी किती गांधींना गोळ्या घालणार आहे तो…?
गांधी पण पुन्हा पुन्हा जन्म घेतच राहणार
आपण एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही.
आपला गांधींवर आणि स्वतःवर विश्वास मात्र हवा
पुनर्जन्मावर असो वा नसो.
पहिल्या सात ओळींतून 30 जानेवारी 1948च्या गांधीवधासंबंधीचा प्रसंग तपशीलवार वर्णन करण्यात आला आहे. यात गांधीजींइतकेच, किंबहुना किंचित जास्त नथुराम गोडसे याचे चित्रण करण्यात आले आहे. त्याच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचे, धर्माचे, श्रद्धांचे चित्रण कवीने साधले आहे. गांधीजींची हत्या ते ‘प्रार्थना’ करीत असताना होते आणि हत्या करणाराही ‘पुनर्जन्मावर विश्वास असणारा’ होता असे दाखवून यातील विरोधनाटय़ केळुसकरांनी नेमकेपणाने टिपले आहे. आणखीही एक विशेष जाणवतो आणि तो म्हणजे केळुसकर हत्येचे एक टोक गांधीजींच्या हत्येला जोडतात, तर…
आता त्याने सकाळची वेळ निवडलीय
नको असलेल्या म्हाताऱयांना संपवण्यासाठी
आणि भेकड झालाय अधिकच
गोळ्या घालून पळून जातो मोटरबाईकवरून…
(मागच्या सीटवर बसून )
असे नोंदवून त्याचे दुसरे टोक ते दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत आणून सोडतात. त्या कृत्यातील तपशील बदलही ते लक्षात घेतात. विचारभिन्नतेचे, सुडाचे, हत्येचे हे चक्र असेच चालू राहणार हे सत्यही ते तिथे सूचित करतात. यात पुनर्जन्माविषयी प्रत्येकाच्या विचारांचे स्वातंत्र्य ते अबाधित ठेवतात.
एक अतिशय अंतर्मुख कवी त्याच्या सर्व सामर्थ्यानिशी सभोवतालातील विपरित परिस्थितीला रिआक्ट होतो तेव्हा त्याची भाषा, शब्दकळा, अभिव्यक्तीचा सारा बाज मृदू, कोमल असणे शक्यच नाही. तिथे…
‘डमडमत डमरू ये
शंक फुंकीत ये
येई रुद्रा।’
असे उग्र रूपच अपेक्षित असते आणि या कवितांमध्ये ते ओतप्रोत भरलेले आहे. ते आक्रमक आणि वाचकाला आतून अस्वस्थ करणारे निश्चित आहे.