विज्ञान-रंजन – कृत्रिम बर्फाची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

मार्च महिन्याच्या सुरुवातीला लेख लिहीत असताना ‘येते तीन महिने उन्हाची काहिली होणार’ वगैरे बातम्या येऊ लागल्या आहेत. गेली काही वर्षे अनेक कारणांनी ऋतुचक्रातील सर्वच ऋतू तीव्र झाल्याचं दिसतंय. वनसंपदा असलेल्या भागात उन्हाच्या झळांचं रूपांतर कधी वणव्याच्या ज्वालांमध्ये होईल सांगता यायचं नाही. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाने त्याचा धसका घेतलाच आहे.

सामान्य माणसं आपापल्या पद्धतीने उन्हाळय़ाशी सामना करतील. टोप्यांची विक्री वाढेल, एसी, कूलरचा वापर सुरू झाला की विजेची मागणीही अधिक होईल. डोक्यावर गरगरते पंखे तर सर्वत्र सतत फिरत राहतील. कुठे वाळय़ाचे पडदे लागतील तर प्राणी-पक्षी दाट वनश्रीचा आश्रय घेतील. शहरी भागातल्या काँक्रिटच्या जंगलात उन्हाने व्याकूळ झालेले अनेक पक्षी पाण्याच्या थेंबासाठी खिडकीत येतील… आणि दुष्काळी भागातली माणसंही लांबवर पायपीट करून घडाभर पाणी मिळतंय या विवंचनेत असतील.

हे चित्र गेल्या काही दशकांत अधिक दारुण होत चाललंय. जगभरच्या विविध भागांतली जनता उन्हाळी पाणीकपातीचा अनुभव घेतेय. अगदी अमेरिकेतलं कॅलिफोर्नियासुद्धा याला अपवाद नाही. उद्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’ने समुद्राची पातळी वाढली तर ती किती किनारपट्टय़ा गिळंकृत करेल सांगता येत नाही. पृथ्वीवरचं सगळंच बर्फ वितळलं तर समुद्र किती फोफावेल आणि त्याचं कायमचं उधाण रोखणं किती कठीण जाईल याचा अंदाज येऊनही जगातले सर्व सत्ताधीश त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. उन्हाळी हंगाम आपल्याकडे आंबे-कोकमाचा, फणस-काजूचा. या उन्हाळी फळांना आता मागणी येईल. कोकम सरबत अनेक ठिकाणी मिळू लागेल. उसाचा रस पिणाऱ्यांची संख्या वाढेल. शिवाय कोल्ड ड्रिंक्सची वार्षिक उलाढाल याच काळात जास्त. त्यातच विविध फ्लेवरच्या आइस्क्रीमची भर पडेल.

यावरून आठवला तो आमच्या लहानपणीचा घरीच आइस्क्रीम बनवण्याचा कार्यक्रम. त्यासाठीचा लाकडी आइस्क्रीम पॉट आणि आतली भांडी असा संच असायचा. त्या बंद डब्यांमध्ये मलईचं दूध, गुलाब-वेलची-केशराचा स्वाद मिसळून ठेवलं जायचं. बाहेरच्या लाकडी (बादलीसारख्या) ‘पॉट’मध्ये मीठ आणि बर्फ घालायचं आणि हाताने हॅन्डल फिरवून आतल्या मलई-दुधाचं आइस्क्रीम होईपर्यंत वाट पाहायची.

यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्फ. त्यासाठी बर्फाची लादी आणून फोडण्याचा कार्यक्रम असायचा. बर्फाचे खडे आइस्क्रीम पॉटमध्ये टाकण्यात आम्हा मुलांना मजा वाटायची. कालांतराने घरोघर रेफ्रिजरेटर आले आणि आइस्क्रीम पॉट कायमचे माळय़ावर गेले किंवा मोडीत निघाले.

कृत्रिम बर्फ-निर्मिती मात्र विविध कारणांसाठी सुरूच राहिली. आजही लाकडाच्या भुशात दडवून न पाघळता घट्ट राहिलेल्या बर्फाच्या ‘लाद्या’ मिळतातच. तोच बर्फ किसून त्याचे रंगीबेरंगी बर्फाचे गोळे बनवण्याचा उद्योगही उन्हाळय़ात बहरतो.

कृत्रिम किंवा ‘सिंथेटिक आइस’ची ओळख सध्याच्या पिढीला असेल, पण आपण जो बर्फ आणतो तो ‘आइस-फॅक्टरी’त तयार झालेला. विल्यम क्युलेन यानी या कृत्रिम ‘रेफ्रिजरेशन’चा शोध 1748 मध्ये लावला. नंतर 1844 पासून पाश्चात्य जगात वैद्यकीय वापरासाठी कृत्रिम बर्फ तयार होऊ लागलं. परंतु कृत्रिम बर्फनिर्मिती व्यापारी तत्त्वावर सुरू झाली ती एकोणीसाव्या शतकात. दिवसाला तीसेक किलो बर्फ तयार करणारे छोटे कारखाने निघाले.

सन 1863 मध्ये ‘मुंबईचे वर्णन’ लिहिणारे लेखक गोविंद नारायण माडगावकर यांनी त्यापूर्वीच्या शतकभराचे वर्णन तर केलेच आहे, पण आधुनिकतेची चाहूल लागलेल्या आणि पाश्चात्यांकडून येणाऱया यंत्रतंत्राचीही माहिती आहे. देशातील पहिली रेल्वे गाडी, कॅमेरा वगैरे अनेक गोष्टींबरोबरच त्यांनी कृत्रिम बर्फाच्या निर्मितीची माहिती दिली आहे. पूर्वी आपल्याकडे कृत्रिम बर्फ अमेरिकेतून येत असे आणि त्याला मुंबईत चांगलीच मागणी होती. 1862 मध्ये इंग्रजानी गिरगावात बर्फ बनवण्याचा कारखाना काढला आणि कृत्रिम बर्फाची निर्मिती देशात सुरू झाली.

‘आइस फॅक्टरी’ पाहायला जाण्याची सहल आमच्या शाळेतूनही निघाली. आम्ही चेंबूरची अशी फॅक्टरी पाहिल्याचं आठवतं. कृत्रिम बर्फ बनवण्याची रीत तशी सोपी, आमोनिया वायूवर प्रचंड दाब दिल्याने तो द्रवीभूत होतो आणि ज्या टँकमध्ये (टाकी) पाणी भरून बर्फ बनवायचा असतो त्याभोवतीच्या नळय़ांमधून हा लिक्विड आमोनिया फिरवला जातो. त्यामुळे आतील पाणी हळूहळू शून्य तापमानापर्यंत येऊन त्याचा बर्फ बनतो. घरी वापरण्याच्या आइस्क्रीम पॉटमध्येही बर्फ विकत आणलेला असला तरी त्यात मीठ घालून ‘फ्रिजिंग मिक्चर’ तयार झाले की त्याचे तापमान शून्याखाली जायला मदत होते आणि आतील भांडय़ांमधल्या दूध-मलईचे आइस्क्रीम बनते.

उन्हाळय़ाच्या निमित्ताने या कृत्रिम बर्फाची आणि त्या आइस्क्रीम पॉटची आठवण आली… पण ठेल्यावर बर्फाचे गोळे विकणारे पिंवा कुल्फी बनवणारे याच प्रकारे थंड पदार्थ तयार करतात. तयार बर्फ लाकडाच्या भुशात ठेवला जातो. कारण लाकूड उष्णतावाहक नाही. कृत्रिम बर्फाचे क्युब आता फ्रीजमधेही तयार करता येतातच.