आनंदी आणि समाधानी जीवनासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. प्रीतम भी. गेडाम

[email protected]

मनुष्य जीवन समाधानाने जगण्यासाठी आहे, केवळ दिवस काढण्यासाठी नाही. व्यस्ततेचे कारण देणे सोडा आणि स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढायला शिका. आपली चांगली कर्मे करत राहा आणि पुढे जात राहा. सर्वांत जास्त स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या. आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगाल तरच तुम्हाला मिळालेले मानवी जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.

आज मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या अत्यंत वेगाने वाढल्या आहेत; मात्र लोक या आरोग्य समस्यांशी तडजोड करून घुसमटत जीवन जगत आहेत. तणावामुळे सिझोफ्रेनिया मनोविकार, द्विध्रुवी आणि मनोदशा विकार, प्रमुख नैराश्य विकार, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस विकार, तीव्र चिंता, खाण्याचे विकार, मादक पदार्थांच्या सेवनाशी संबंधित विकार, टाइप-2 मधुमेह आणि चयापचय सिंड्रोम, हृदयरोग, स्थूलता, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीस, मज्जासंस्थेशी संबंधित आणि स्नायू-हाडांच्या समस्या, दीर्घकालीन वेदना सिंड्रोम, मायग्रेन, ऑस्टिओपोरोसिस आणि हालचालींशी संबंधित विकार, जठरांत्रीय तसेच प्रतिकारशक्तीशी संबंधित विकार यांसारखे अनेक गंभीर विकार उद्भवू शकतात. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात याही वर्षी 10 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला गेला.

मनुष्याने प्राण्यांप्रमाणे साधे जीवन जगायला हवे, मात्र खोटय़ा देखाव्याच्या आणि आधुनिकतेच्या स्पर्धेत मनुष्य आपले मानसिक आरोग्य उद्ध्वस्त करत आहे. अनेक वेळा जीवनात इतरांच्या आनंदासाठी चांगले लोक स्वतःच्या आनंदाचाही त्याग करतात. हे असेच सुरू राहते आणि इतरांच्या आनंदाची काळजी घेताना आपण आपली मानसिक शांती गमावून बसतो. जीवनात सर्वात जास्त आवश्यक असते ते म्हणजे मानसिक शांतता, ज्यामुळे मनुष्य शांतपणे श्वास घेऊ शकतो. मानसिक सुकून हा आपल्या मनातील आनंदाशी जोडलेला असतो. तो आपण विकत घेऊ शकत नाही; तर आपल्या सत्कर्मांनी आणि चांगल्या आचरणातूनच तो प्राप्त करू शकतो.

मध्यंतरी मी एक बातमी वाचली होती की, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमधील एका भारतीय उद्योजकाने आपली 100 कोटी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैलीचा त्याग करून भारतातील एका छोटय़ाशा गावात तो स्थायिक झाला. त्याने भौतिक सुख-सुविधांऐवजी मानसिक निसर्गाच्या सान्निध्यातील जीवन आणि आत्मिक संतुलनाला प्राधान्य दिले. हे केवळ एक उदाहरण नाही, जगात अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. जीवनात मानसिक शांती नसेल तर आपल्याकडे सर्व काही असूनही आपण गर्दीत स्वतःला एकटे समजतो. आपले जीवन सर्वांत अनमोल आहे आणि मानसिक शांती आपल्या जीवनातील खऱया यशाचे दर्शन घडवते की आपण किती समाधानाने जगत आहोत. पैशाने केवळ क्षणिक सुखसोयी विकत घेता येतात.

आपल्या देशात कामगार आणि शेतकरी वर्गात आत्महत्येच्या घटना अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. लहान व्यापारी, विद्यार्थी, गृहिणी, युवक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतील व्यक्तींमध्येही आत्महत्येच्या घटना वाढताना दिसतात. अशा घटनांकडे केवळ एका व्यक्तीच्या निर्णयाच्या रूपात न पाहता, त्यामागील मानसिक ताण, भावनिक संघर्ष, सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची तणाव सहन करण्याची आणि संकटांना सामोरे जाण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे अडचणीच्या काळात व्यक्तीला दोष देण्याऐवजी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, भावनांची कदर करणे आणि आवश्यक तेव्हा आधार व मदत मिळवून देणे अधिक महत्त्वाचे आहे.

नेते चांगले असोत किंवा वाईट, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या नेत्यांना विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक दबावांना सामोरे जावे लागते. निवडणुकीतील पराभव, आरोप, घोटाळय़ांबाबत तपास यंत्रणांची कारवाई, माध्यमांमधील टीका, न्यायालयीन प्रकरणे, राजकीय मतभेद, धमक्या तसेच आर्थिक किंवा सामाजिक नुकसान यांसारख्या परिस्थिती त्यांच्या समोर येऊ शकतात. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही नेते आपली सार्वजनिक जबाबदारी पार पाडताना संयम आणि आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीच्या काळात अनेक नेते वय वाढलेले असतानाही शेकडो-हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. पाऊस, ऊन, थंडी, वादळ किंवा खराब हवामान यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही ते कमी झोप आणि विश्रांतीच्या मर्यादित वेळेत शारीरिक व मानसिक दबावाचा सामना करत काम करतात. सभा आणि रॅलींमध्ये त्यांचा उत्साह व ऊर्जा दिसून येते. त्यामुळे नेत्यांच्या सार्वजनिक जीवनातून कठीण परिस्थितीत संयम राखणे, आत्मविश्वास टिकवून ठेवणे आणि तणावाचे सकारात्मक पद्धतीने व्यवस्थापन करणे यांसारखे उपयुक्त गुण प्रत्येकाला शिकता येतात.

प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी इतरांच्या मनाशी खेळत असतो. इतरांच्या आनंदासाठी आपल्या आनंदाचा गळा घोटू नका. जी व्यक्ती आपल्या वाईट काळात आपली साथ देते, आपल्या भावनांची कदर करते आणि आपली काळजी घेते, आपणही तिची कदर केली पाहिजे. इतर लोक आपल्या स्वार्थानुसार खेळ खेळतात; त्यांना आपल्या जीवनाशी खेळण्याची संधी देऊ नका. कोणाचीही कठपुतली बनू नका. अशा लोकांपासून सावध राहा आणि दूर राहा. आपल्या आत्मिक आनंदाचा अर्थ समजून घ्या. भौतिक सुख-सुविधाच सर्व काही नाहीत. निश्चिंतपणे जगायला शिका. तणावामुळे कोणताही फायदा होत नाही, उलट केवळ नुकसानच होते. जीवनातील प्रत्येक समस्येकडे एक संधी म्हणून पाहून हसत-हसत तिचा सामना करा. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. त्याला घाबरायचे नाही, तर त्यासाठी ठामपणे उभे राहायचे आहे. जगातील महान व्यक्तींनीही आपल्या जीवनाला संघर्षांनी घडवले आहे. त्यानंतरच त्यांनी नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

जीवनात पुढे जायचे असेल तर आपले ध्येय निश्चित करा आणि सतत अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करा. दररोज काहीतरी नवीन शिका. जीवनातील छोटय़ा क्षणांतही आनंद वाटायला शिका. आयुष्याबद्दल तक्रारी न करता त्यावर उपाय शोधायला शिका. अतिविचार करणे टाळा आणि लोकांकडून अधिक अपेक्षा ठेवू नका. कधीही हार मानून बसू नका. काळ बदलत असतो; आपलाही काळ बदलेल. आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर तसाच परिणाम होतो. त्यामुळे वाईट विचारांच्या लोकांपासून आणि वाईट सवयींपासून नेहमी दूर राहा. घर-परिवाराची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आनंदाचीही काळजी घ्या. निरोगी छंद, व्यायाम, प्राणीप्रेम, समाजसेवा, परोपकार आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची सवय वाढवा. यामुळे जीवनात शांती मिळते.

मनुष्य जीवन समाधानाने जगण्यासाठी आहे, केवळ दिवस काढण्यासाठी नाही. व्यस्ततेचे कारण देणे सोडा आणि स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढायला शिका. आपली चांगली कर्मे करत राहा आणि पुढे जात राहा. सर्वांत जास्त स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या. आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगाल तरच तुम्हाला मिळालेले मानवी जीवन खऱया अर्थाने सार्थकी लागेल.