…तरीही लवप्रीत स्कॉटलंडमधून खेळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक संघ असे आहेत, जे कधीही कबड्डीची स्पर्धा खेळले नाहीत; पण ते थेट कागदावर आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या स्पर्धेत खेळत आहेत. परदेशात शिक्षणासाठी गेलेले अनेक खेळाडू आता काही संघात खेळाडू, तर काही संघात प्रशिक्षक म्हणूनही भूमिका निभावत आहेत. त्यापैकी किती योग्य आहेत आणि किती अपात्र आहेत हे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर कळेलच, पण आता हिंदुस्थानचे नागरिकत्व असलेल्या लवप्रीत सिंगने थेट स्कॉटलंड संघातून या स्पर्धेत खेळण्याचे धाडस दाखवले.

लवप्रीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळला. त्याने चक्क 23 गुण संपादत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळवला. पण हा खेळाडू स्कॉटलंडकडून खेळत असला तरी त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व नाही. तो शिक्षणासाठी लंडनला गेला होता आणि तो कार्डिफ शहरात शिक्षण घेतोय आणि त्याची निवड राष्ट्रकुल स्पर्धेसाठी स्कॉटलंडमध्ये करण्यात आली. यावरून या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंच्या ना कागदापत्रांची तपासणी केली गेली, ना त्यांना कबड्डी खेळता येतेय याची पाहणी करण्यात आलीय. फक्त संघ तयार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंची धरून पकडून निवड करण्यात आल्याचे सत्य समोर आले. लवप्रीतने केलेली फसवणूक लक्षात येताच त्याला संघाबाहेर काढण्यात आले आहे. आता तो बाहेर गेल्यामुळे स्कॉटलंडचा सिंगापूरविरुद्ध 28-50 असा दारुण पराभव झाला आहे.