
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेते शशांक केतकर तसेच अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्यासह इतर कलाकारांनी त्यांच्यावर थकीत मानधनासंदर्भात अनेकदा तक्रार केली होती. मंदार देवस्थळी यांनी आता पुन्हा एकदा त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली असून, थकीत मानधनाच्या मुद्द्यावर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आपल्याला पुन्हा उभं राहायचं असून थकीत मानधनाचा मुद्दा सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मानधन या विषयावर आपली भूमिका मांडली. या प्रकरणातून आपण पळ काढलेला नाही, असं सांगत त्यांनी पुन्हा काम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. “मी काहीच सोडलं नाहीये. जे काही घडलं, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. मला पुन्हा उभं राहायचं आहे, कारण मला हेच येतं. मी दुसरं काही करू शकत नाही. जे काही घडलं ते मी नाकारत नाही. कुठेही पळून गेलेलो नाही किंवा तसा माझा उद्देशही नाही. जे काही घडलं ते पूर्णत्वाला नेण्याची माझी जबाबदारी आहे,” असं मंदार म्हणाले.
थकीत मानधनाच्या मुद्द्यावर बोलताना मंदार देवस्थळी यांनी संबंधित कलाकारांचे पैसे देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. नव्याने सुरू झालेल्या कामातून आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
ज्या कलाकारांनी मानधनाबाबत तक्रारी केल्या, त्यांच्याशी आपला संवाद झाला होता का, असा प्रश्न मंदार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी संबंधितांशी संभाषण होत असल्याचं सांगितलं. मात्र, काही प्रश्नांची उत्तरं देता येत नसल्यामुळे आपण काही वेळा संवाद टाळत असल्याचंही त्यांनी मान्य केलं. “संभाषण होतं. पण मी ते काही वेळेला टाळतो. कारण कधी, का या गोष्टी घडल्या, याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आता या मालिकेच्या निमित्ताने माझं काम सुरू होत आहे. त्यामुळे लवकरच या गोष्टी माझ्याकडून घडतील आणि माझ्याबद्दल जे काही पसरलं आहे, ते सगळं नीट होईल,” असं मंदार म्हणाले.


























































