
ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकाच्या समोरील उड्डाणपुल रखडल्यामुळे अपघातांमध्ये आतापर्यंत २३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुमारे ५६ नागरिक कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे या रखडपट्टीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी या ठाणे-बेलापूर मार्गावर रास्तोरोको केला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
तुर्भे स्टोअर्स परिसरात रस्ता ओलांडत असताना कचरा गाडीची धडक बसून एका महिलेला दोन दिवसांपुर्वी आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडे प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख महेश कोटिवाले, संतोष घोसाळकर, संदीप पाटील, समीर बागवान, सिद्धाराम शीलवंत, रोहिणी भोईर, वैशाली घोरपडे, प्रवीण पाटील, कार्तिक पिल्ले, राहुल वाघमारे, सचिन चिलमे, अजित गुप्ता, प्रमोद बंडेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

























































