
प्रथमच होत असलेल्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बहुतांश संघ प्रथमच खेळत आहेत. त्या दुबळ्या संघाविरुद्ध हिंदुस्थान आपला आक्रमक आणि पारंपारिक न खेळता त्यांच्याशी लुटूपुटूची लढाई करत असल्याचे चित्र दिसत आहे. नवख्या संघांवर जोरदार हल्ले न करता त्यांना कबड्डीचे धडे देत हिंदुस्थानच्या पुरुष संघाने आधी युगांडाला 44-30 असे तर नंतर मलेशियाला 37-23 असे नमवत आपले नॉनस्टॉप विजय कायम ठेवले. तसेच काल हरलेल्या इंग्लंडने आज पहिल्या विजयाची नोंद करताना नायजेरियाचा 68-18 असा धुव्वा उडवला.
इंग्लंडचा जोरदार विजय
हिंदुस्थानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सहज मात खालेल्या इंग्लंडने आज नायजेरियाचा 68-18 असा दारुण पराभव केला. नायजेरियाचा संघ फारच कमकुवत दिसतोय. त्यांना कबड्डीचा मूळ खेळही माहीत नसल्याचे त्यांच्या चढाया-पकडींवरून दिसतेय. शनिवारीही त्यांना टांझानियाने 17-66 असे नमवले. त्याचप्रमाणे कॅनडाने ऑस्ट्रेलियाचा 74-28 असा फडशा पाडला.
महिलांमध्ये नायजेरिया जोरात
पुरुष संघाचा दारुण खेळ होत असला तरी नायजेरियाच्या महिला संघाने मात्र सिंगापूरचा 43-20 असा सहज पराभव केला. दोन्ही संघ नवखे असल्यामुळे त्यांचा खेळ पाहून बालवाडीतील मुले आंतरराष्ट्रीय कबड्डीत खेळत असल्याचा भास झाला. दुसरीकडे श्रीलंकेच्या महिलांनी इंग्लंडचा 65-16 असा धुव्वा उडवला.
नीरज नरवालचा भन्नाट खेळ
हिंदुस्थानच्या आक्रमणाची धुरा नीरज नरवालने आक्रमकपणे सांभाळताना दहा गुणांची कमाई केली. त्याच्या खेळासमोर मलेशियाची बचावफळी अक्षरशा भेदरलेली भासली. नवीन कुमार आणि भरत यांनीही जोरदार खेळ करत आक्रमणाला धार दिली, तर आदित्य शिंदेने चार गुणांची भर घातली. एकाच खेळाडूवर अवलंबून न राहता अनेकांनी गुणांची जबाबदारी उचलल्यामुळे हिंदुस्थानला सामन्यावर पकड कायम ठेवता आली. विशेष म्हणजे हिंदुस्थानी खेळाडूंनी सुसाट खेळ न करता मलेशियाच्या कलेने खेळ करत त्यांनाही कबड्डीचे धडे गिरवायला मदत केली. अन्य संघ 50-50 गुणांनी विजय मिळवत असताना हिंदुस्थान मात्र दहा-वीस गुणांनी जिंकतोय. हा सारा खेळ पाहून हिंदुस्थान अर्ध ताकदीनेच खेळत असून नवख्या संघांचा धुव्वा उडवत नाहीय. कालही युगांडा या कमकुवत संघाविरुद्ध हिंदुस्थानने असाच सामान्य खेळ केला होता.
































































