
ब्राझीलमधील रिओ दी जनेरियो येथे वर्ल्ड स्कूल गेम्स 2026 च्या ‘आयएसएफ जिम्नासियाड’ मध्ये 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मानस शिंदेची निवड झाली आहे. ही स्पर्धा 3 ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. 6 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यातील बांबोलिम स्टेडियमवर यासाठीच्या निवड चाचण्या घेण्यात आल्या. मानसने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत 47.89 सेकंदांची वेळ नोंदवली.
या यशानंतर मानस म्हणाला, ‘माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. नीलेश सर हे माझे प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ही चांगली कामगिरी करता आली आहे. मी यापुढेही अधिक कठोर परिश्रम करेन.’
मानसच्या या घवघवीत यशाबद्दल प्रशिक्षक नीलेश पाटकर म्हणाले, ‘मानस हा अत्यंत शिस्तप्रिय आणि मेहनती खेळाडू आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या कामगिरीत चांगली सुधारणा केली आहे. मानस हा माझा सातवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ठरला आहे. ‘आयएसएफ जिम्नासियाड’मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेला तो ठाणे जिह्यातील पहिलाच पुरुष खेळाडू आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.’ याप्रसंगी मीनल पालांडे (उपायुक्त-टीएमसी) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख – टीएमसीएपीवाय) यांनी मानस व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
स्कूल्स गेम्ससाठी निवडलेले खेळाडू
यश मुळीक, मानस शिंदे, सत्यम पाल, रोहित तोमर, संतोष कुमार फैझल हक, वीरेंद्र यादव, प्रेम राज, सोहम बिश्वास, युवराज सैनी, स्वप्नील दत्ता, आयुष राज, भूमिका नेहाते, निवेद्या कलाधर, स्नेहल खरात, शौर्या अंबुरे, अनामिका अजेश, स्वानंदी सावंत, रेणुका भूपती, महालक्ष्मी राजा, अविश्का यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

























































