
अहमदाबाद येथे सुरू असलेली पहिलीवहिली राष्ट्रकुल स्पर्धा वादाच्या चक्रव्यूहात अडकतच चालली आहे. या स्पर्धेत खेळत असलेला टांझानियाचा संघ आपला अधिकृत संघ नसल्याचे खुद्द टांझानियाची अधिकृत कबड्डी संघटना असलेल्या टांझानिया कबड्डी क्रीडा संघटनेने (टीकेएसए) हिंदुस्थानी केंद्र सरकार, हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघ (एकेएफआय), आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ (आयकेएफ) आणि कॉमनवेल्थ स्पोर्ट्स यांना कळवले होते आणि या स्पर्धेसाठी पाठवलेल्या संघाची चौकशी करण्याची मागणीही केली होती. मात्र त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
राष्ट्रीय संघ निवडला कुणी?
टांझानियाचे प्रतिनिधित्व करणाऱया संघाची निवड अधिकृत राष्ट्रीय निवड प्रक्रियेतून झालेली नसल्याचा आरोप टीकेएसएने आपल्या निवेदनात केले होते. संबंधित खेळाडूंनी टीकेएसएच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेतलेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे होते. इतकेच नव्हे, तर या संघातील खेळाडूंची निवड ज्या क्लबमधून झाली, त्या क्लबना मान्यताप्राप्त राष्ट्रीय संघटनेची आवश्यक परवानगी मिळालेली नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. राष्ट्रीय संघाची निवड पारदर्शक आणि निष्पक्ष प्रक्रियेतून होणे आवश्यक असताना त्याला बगल देऊन एखादा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरवला जात असेल तर त्या संघाच्या पात्रतेची आणि प्रतिनिधित्वाच्या वैधतेची तपासणी करणे बंधनकारक आहे, अशी भूमिका टांझानिया संघटनेने मांडली आहे.
‘फेडरेशन’च्या नोंदणीवरच आक्षेप!
या वादातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टांझानियाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱया कबड्डी फेडरेशन ऑफ टांझानिया (केएफटी) या संस्थेकडे कोणतीही वैधता नाही आणि टीकेएसए हीच अधिकृत संघटना असल्याचे टांझानियाच्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेनेही मान्य केले होते.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडीची आणि संघ निवडीची प्रक्रिया टीकेएसएच्या मान्यतेनेच घेतली जावे, असे निर्देशही दिले होते.
टांझानियाचा संघ सरकारने पाठवलाय – गहलोत
टांझानियाच्या नावाने कॉमनवेल्थमध्ये खेळत असलेला संघ हा तिथल्या सरकारने पाठवला आहे, अशी माहिती आयकेएफच्या तेजस्वी गहलोत यांनी दिली. त्यामुळे या संघाबाबत आमच्या कोणताही आक्षेप नाही. तसेच या संघाबाबत माझ्याकडे किंवा आयकेएफकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.
खेळणारा संघ झांझीबारचा…
हिंदुस्थानात खेळत असलेला संघ हा झांझीबार या बेटावरच्या क्लबचा आहे. झांझीबार हा बेट संयुक्त टांझानिया प्रजासत्ताकचा भाग असून तेथे स्वतंत्र क्रीडा व्यवस्था आहे. मात्र टांझानिया म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्याकडे राष्ट्रीय अधिकृत मान्यता नसल्याचेही टीकेएसएने आपल्या निवेदनात कळवले आहे.
संघ कधीपासून सरकार पाठवू लागलेत
कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ पाठविण्याची जबाबदारी तेथील क्रीडा संघटनेवर असते. जर संघाबाबत काही अडचणी असतील तर सरकार यात हस्तक्षेप करते आणि खेळाच्या मुख्य संघटनेच्या माध्यमातूनच संघ निवडून स्पर्धेसाठी पाठवते. जर टांझानियात टीकेएसएकडे अधिकृत कबड्डी संघटनेची मान्यता असताना सरकारने टांझानियाचा संघ पाठवलाच कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
























































