
स्वतःला हुकूमशहा मानून मनमानी करणाऱया आणि जनतेला वेठीस धरणाऱया सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘स्टुडंट लिस्ट’ या आघाडीने ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अलेक्झांडर यांना लोकांनी सत्तेतून बाहेर फेकले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही निवडणूक जिंकली ते गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचार आणि सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आंदोलन करत होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून विद्यार्थ्यांच्या आघाडीला संसदेतल्या 250 पैकी 135 जागा मिळाल्या आहेत.
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच हे 2012 पासून सर्बियाच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक होते. ते राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान अशा दोन्ही पदांवर राहिलेले आहेत. वुचिच यांनी निवडणुकीत झालेला पराभव मान्य करताच राजधानी बेलग्रेडमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी त्यांनी सर्बियाचे झेंडे फडकावले. गाडय़ांचे हॉर्न वाजवून आनंद साजरा केला. रस्त्यांवर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 70 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 1992 मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे. युरोपीय नेते आणि अधिकाऱ्यांनी स्टुडंट लिस्टच्या विजयाचे स्वागत केले आहे. युरोपीय संघाच्या विस्तार आयुक्त मार्ता कोस यांनीही निवडणूक निकालांचे स्वागत केले. युरोपीय संघ सर्बियाला सदस्यत्वाच्या दिशेने पुढे जाण्यास मदत करण्यासाठी त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे, असे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयेन यांनी सांगितले.
एका आंदोलनामुळे सरकार गेले
नोव्हेंबर 2024 मध्ये नोवी साद शहरात एका रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लोकांचा संताप वाढला. सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा का झाला आणि यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई का करण्यात आली नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. लोकांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि जबाबदारीपासून पळ काढल्याचा आरोप केला. हळूहळू विद्यार्थी आंदोलन अधिक व्यापक होत गेले. आंदोलकांनी सरकारमध्ये बदल करण्याची मागणी सुरू केली. त्यांनी वुचिच यांनी पद सोडावे, अशीही मागणी केली. अखेर निवडणुकीत वुचिच सरकारचा दारुण पराभव झाला.
सरकार स्थापन करण्याचे आव्हान
विजयी झालेल्या स्टुडंट लिस्टसमोर अनेक आव्हाने आहेत. नव्या सरकारचे नेतृत्व कोण करणार आणि विद्यार्थी आंदोलन आपली आश्वासने कशी पूर्ण करणार, यासारखी आव्हाने आहेत. स्टुडंट लिस्टमध्ये 250 उमेदवार आहेत. यामध्ये विद्यापीठाचे प्राध्यापक, अभिनेते आणि शेतकरी यांचा समावेश आहे. आंदोलनाने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे, कायद्याचे पालन सुनिश्चित करण्याचे आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. या सरकारसमोर परराष्ट्र धोरणाचेही आव्हान असेल.



























































