
उन्हाच्या काहिलीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आता हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. दिल्लीत सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढला असून, मंगळवारी दिल्लीचे किमान तापमान 15.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबर 2023 रोजी किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अद्याप ‘मध्यम’ श्रेणीत कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ‘समीर’ ॲपवरील आकडेवारीनुसार, मंगळवारी दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 168 इतका नोंदवला गेला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सफदरगंज भागात किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा 1.9 अंशांनी कमी होते. तर मंगळवारी दिवसाचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, यामुळे सकाळ आणि रात्री गारवा जाणवणार असला तरी दुपारच्या वेळी मात्र उबदारपणा कायम राहील. दिल्लीच्या विविध भागांमध्ये किमान तापमानात तफावत दिसून आली आहे. पालम येथे 15.5 अंश सेल्सिअस (सामान्यपेक्षा 2.3 अंश कमी), लोधी रोडवर 15.6 अंश सेल्सिअस (सामान्यपेक्षा 0.4 अंश कमी), रिज भागात 16.2 अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा 2.3 अंश कमी) तर अयानगरमध्ये 15.2 अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा 2 अंश कमी) इतक्या तापमानाची नोंद झाली. या आकडेवारीवरून दिल्लीच्या बहुतांश भागांत सकाळच्या वेळी हुडहुडी भरवणारी थंडी असल्याचे स्पष्ट होते. हवामान तज्ज्ञांच्या मते, किमान तापमान म्हणजे एका दिवसात नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान होय. रात्रीच्या वेळी पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होऊ लागल्याने सभोवतालचा गारवा वाढतो. ऑक्टोबरच्या अखेरीस दिल्लीत हा बदल प्रकर्षाने जाणवतो. मात्र, सकाळचे तापमान घटले म्हणून दिवसभर थंडी राहीलच असे नाही; सूर्यप्रकाश किंवा ढगांच्या स्थितीनुसार दिवसाच्या तापमानात बदल होत असल्याने सकाळी आणि दुपारच्या हवामानात मोठा फरक अनुभवायला मिळतो.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आगामी काही दिवस तापमानाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. सकाळी व रात्री थंडीचा प्रभाव कायम राहणार असला तरी पुढील काही दिवसांत कमाल तापमान थोडे उच्चच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता सकाळी व रात्रीच्या गुलाबी थंडीसोबतच मध्यम प्रदूषणाचा सामना करत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
























































