सीआयडी मालिकेचे निर्माते बी. पी. सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय टेलिव्हिजन विश्वात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली.

बी. पी. सिंह यांचे पूर्ण नाव बृजेंद्र पाल सिंह असे होते. त्यांच्या निधनाची पुष्टी ज्येष्ठ अभिनेते आणि टेलिव्हिजन अँड सिने आर्टिस्ट्स असोसिएशनशी (CINTAA) संबंधित अमित बहल यांनी केली. भारतीय टेलिव्हिजनवर क्राइम-थ्रिलर आणि हॉरर या प्रकारांना लोकप्रियता मिळवून देण्यात बी. पी. सिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या ‘फायरवर्क्स प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झालेल्या ‘सीआयडी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली होती. ‘आहट’ या भयपट मालिकेने 1990 च्या दशकात प्रेक्षकांमध्ये भीती आणि उत्कंठेचे वेगळे वातावरण निर्माण केले. रहस्य, थरार आणि भय यांची सांगड घालणाऱ्या या मालिकेने त्या काळात मोठी लोकप्रियता मिळवली. या दोन्ही मालिकांमुळे बी. पी. सिंह यांचे नाव भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कायमचे कोरले गेले.