
दिवाळी जवळ आल्याने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये आता गर्दीचे तुफान येणार आहे. उल्हासनगरमध्येही दरवर्षी गर्दी होते. त्यात बेशिस्त वाहतुकीमुळे प्रचंड कोंडी होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीवर कडक निर्बंध लावले आहेत. बाजारपेठेत दुपारी १२.३० ते मध्यरात्रीपर्यंत ट्रक, टेम्पोतून मालाच्या चढउतारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कोंडीतून खरेदीदारांची सुटका होणार आहे.
उल्हासनगर कॅम्प-२मधील नेहरू चौक ते शिरू चौक परिसरात कपडे आणि विविध वस्तूंची मोठी घाऊक बाजारपेठ आहे. याच परिसरातील जपानी मार्केट आणि गजानन मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते.
दुसरीकडे नेहरू चौक ते अमन रोड दरम्यान विद्युत साहित्य आणि फटाक्यांची दुकाने असल्याने या मार्गावरही वाहनांची वर्दळ असते. सणासुदीच्या काळात पादचारी, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि मालवाहू वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी एक अधिसूचना जारी केली असून वाहतुकीतील बदल निश्चित केले आहेत. मार्केट परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
असे आहेत बदल
पटेल मार्ट चौकाच्या पुढे दुचाकी वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांना पटेल मार्टवरून डावीकडे वळून हिरा मॅरेज हॉल – मधुबन चौक गोल मैदान मार्गे जाता येईल.
नेहरू चौकाच्या पुढे दुचाकीशिवाय इतर वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहने देवी भवानी चौक गोल मैदान उल्हासनगर १ या मार्गाचा वापर करू शकतात. अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.


























































