
आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक पटकावणारा पॅरा अॅथलेटिक्स नीरज यादव याचे मंगळवारी राहत्या घरी संशयास्पद निधन झाले. नीरजने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थानी पॅरा-अॅथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी बातमीला दुजोरा दिला. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात बुधवारी नीरजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले; यावेळी पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि सहकारी पॅरा-अॅथलीट विपिन कसाना उपस्थित होते.
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला नीरज पॅरा-ॲथलेटिक्समध्ये F55 श्रेणीत भालाफेक (जॅव्हेलिन थ्रो) आणि थाळीफेक (डिस्कस थ्रो) या क्रीडा प्रकारांत देशाचे नेतृत्व करत होता. नीरजने 2018 च्या जकार्ता आशियाई पॅरा गेम्स आणि 2022 च्या हांगझू आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, हांगझू येथे त्यांनी थाळीफेकीतही सुवर्णपदक पटकावले होते. पॅरा-ॲथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी, 2005 ते 2012 या काळात त्याने व्हीलचेअर टेनिसमध्येही सहभाग घेतला होता, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोपिंगच्या आरोपाखाली निलंबन झाल्यामुळे आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होता न आल्याने नीरज मानसिक तणावात होता. ऑक्टोबर 2023 मध्ये नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीद्वारे बेंगळुरू येथील साई केंद्रात घेण्यात आलेल्या चाचणीत नीरज यादव स्टॅनोझोलोल या ॲनाबॉलिक स्टिरॉइडच्या सेवनामुळे दोषी आढळला होता. त्याच्यावर नोव्हेंबर 2023 मध्ये ‘अँटी-डोपिंग नियम उल्लंघना’चा (ADRV) आरोप ठेवण्यात आला आणि 2024 मध्ये त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले.
































































