
सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान लष्कराने केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 113 जण जखमी झाले आहेत. दक्षिण दारफूरची राजधानी असलेल्या ‘न्याला’ (Nyala) शहरातील एका गजबजलेल्या बाजारावर सोमवारी संध्याकाळी हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. ‘इमर्जन्सी लॉयर्स’ या स्थानिक मानवाधिकार संघटनेने मंगळवारी या घटनेची माहिती दिली.
मृतांमध्ये महिला व बालकांचे प्रमाण मोठे
मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असताना अचानक ड्रोनद्वारे बॉम्बवर्षाव करण्यात आला. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत रक्ताचा सडा पडला होता. या हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. या संघटनेने या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध करत सुदानी लष्कराला जबाबदार धरले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयात मृतदेहांचा खच
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्था ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ (MSF) ने सांगितले की, न्याला येथील त्यांच्या रुग्णालयात 36 मृतदेह आणण्यात आले होते, तर सुमारे 113 जखमींवर आपत्कालीन कक्षात उपचार सुरू आहेत.
न्याला शहरावर सध्या निमलष्करी दल ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’ (RSF) चे नियंत्रण आहे. एप्रिल 2023 पासून सुदानी लष्कर आणि आरएसएफ यांच्यात देशाच्या सत्तेवरून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवला असून रुग्णालये, शाळा, बाजारपेठा, धरणे आणि निर्वासितांच्या छावण्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. संयुक्त राष्ट्रांनीही (UN) या वाढत्या ड्रोन हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवावर ओढवलेल्या संकटाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.





























































