
चेन्नईतील अड्यार भागातील इंदिरा नगर येथे मंगळवारी एका २५ वर्षीय सराईत गुन्हेगाराची एका टोळीने भरदिवसा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. पोलीस ठाण्यात जामिनाची हजेरी लावून रिक्षामधून घरी परतत असताना हा थरार घडला. याप्रकरणी अड्यार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
व्ही. मैत्रेयन (वय २५, रा. मायलापूर) असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. तो ‘सी’ कॅटेगरीतील सराईत गुन्हेगार होता. या प्रकरणी पोलिसांनी जीवानंदम (२०), सूर्या (१९) आणि विघ्नेश (१९) या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
जुन्या वैमनस्यातून घडले हत्याकांड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रेयनवर अनेक गुन्हे दाखल होते आणि गेल्याच आठवड्यात तो एका गुन्ह्यात जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. न्यायालयाच्या अटींनुसार त्याला दररोज सकाळी मायलापूर पोलीस ठाण्यात जाऊन हजेरी नोंदवावी लागत होती.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवानंदम आणि त्याच्या टोळीने मैत्रेयनचा जवळचा मित्र ‘सुसाई’ याची हत्या केली होती. आपल्या मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मैत्रेयन कट रचत असल्याची कुणकुण आरोपींच्या टोळीला लागली होती. तो आपल्यावर हल्ला करण्याआधीच त्याचा काटा काढण्याचा कट या टोळीने रचला.
रिक्षा अडवून पाठलाग करत सपासप वार
मंगळवारी सकाळी ११ वाजता मैत्रेयन पोलीस ठाण्यात हजेरी लावून ऑटो रिक्षातून घरी परतत होता. इंदिरा नगर परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याची रिक्षा अडवली. धोका ओळखून मैत्रेयनने जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी भररस्त्यात त्याचा पाठलाग केला आणि रस्त्यावरच धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले.
रक्तबंबाळ झालेल्या मैत्रेयनला नागरिकांच्या मदतीने तरमणी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सरकारी रोयापेट्टा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेह दाखवण्यास विलंब झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर काही वेळ आंदोलनही केले.
हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला; सीसीटीव्हीच्या आधारे अटक
हत्येनंतर आरोपींनी या भयंकर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता; मात्र पोलिसांनी तो तातडीने हटवण्यास लावला. गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

























































