स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन्सची जोरदार धडक; 39 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य स्पेनमध्ये बुधवारी सकाळी दोन हाय-स्पीड ट्रेन्स एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत सुमारे 39 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्पेनचे रेल्वे सिस्टीम ऑपरेटर ‘एडीआयएफ’ने (ADIF) या अपघाताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

स्पॅनिश सरकारी वृत्तवाहिनी ‘टीव्हीई’ने (TVE) दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात टोलेडो (Toledo) प्रांतात बुधवारी सकाळी घडला. एकाच ट्रॅकवर एकाच दिशेने जाणाऱ्या दोन हाय-स्पीड गाड्यांपैकी एका ट्रेनने समोरील ट्रेनच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रेनचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले. अपघातस्थळाजवळील ‘उर्दा’ (Urda) शहराचे महापौर मॅन्युएल गॅलन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने जखमींवर तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी टाउन हॉलमधील स्पोर्ट्स पॅव्हेलियन सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जवळच्या ‘लॉस येबेनेस’ गावाचे महापौर जीसस पेरेझ यांनी हा अपघात अत्यंत भयानक असल्याचे म्हटले आहे. मदत आणि बचाव पथके युद्धपातळीवर डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दरम्यान, कॅस्टिला ला मांचा भागाचे प्रादेशिक अध्यक्ष एमिलियानो गार्सिया-पेज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती देत, आपण तातडीने अपघातस्थळी भेट देण्यासाठी रवाना होत असल्याचे सांगितले आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील हाय-स्पीड रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.