देश विदेश – लुला चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लुला दा सिल्वा यांनी जिंकली असून ते चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार फ्लाविओ बोल्सोनारो यांचा दारुण पराभव केला. बोल्सोनारो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाते. लुला 2003 ते 2011 या काळात  राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले होते. 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. नंतर त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली होती.

अशोक सेन यांना ‘ऑस्कर क्लेन पदक’

भौतिकशास्त्रज्ञ अशोक सेन यांना प्रतिष्ठत ‘ऑस्कर क्लेन पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे अशोक हे पहिले भारतीय ठरले आहेत. ‘ऑस्कर क्लेन पदक’ दरवर्षी स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठ आणि ‘रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस’ची ‘नोबेल कमिटी फॉर फिजिक्स’ प्रदान करते. ‘स्ट्रिंग थिअरी’वरील आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक सेन यांना यापूर्वी ‘डिरॅक पदक’ आणि ‘ब्रेकथ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स’ यांसारखे प्रतिष्ठत सन्मानही मिळाले आहेत.

भाजपचे 15 नेते समाजवादी पक्षात

भाजप आणि बसपामधील 15 बडय़ा नेत्यांनी आज अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश केला. माजी आयएएस राम बहादूर पासी यांनी भाजप सोडून सपामध्ये प्रवेश केला. भाजपचे बदायूंमधील दातागंज मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले सिनोद शाक्य यांनीही सपामध्ये प्रवेश करून घरवापसी केली. अमेरिकेतून परतलेल्या सबीना परवीन यांनीही सपाचे सदस्यत्व स्वीकारले. मेरठचे माजी भाजप उमेदवार दारा सिंह प्रजापती, माजी आमदार अजय राय, प्रदीप पांडेय आणि सौरभ हेही सपात दाखल झाले.